महागड्या भाज्यांनी वाढले स्वयंपाकघराचे बजेट; स्थानिकांसह बाहेरून आवक
By मोरेश्वर मानापुरे | Published: May 14, 2023 02:06 PM2023-05-14T14:06:30+5:302023-05-14T14:06:47+5:30
महागाईची सर्वच वस्तूंना झळ
नागपूर : उन्हाळ्यात भाजीपाल्यांची आवक नागपूर जिल्ह्याबाहेरून आणि अन्य राज्यातून होत आहे. महागड्या भाज्यांनी स्वयंपाकघराचे आर्थिक बजेट बिघडले आहे. किरकोळमध्ये मेथीचे भाव ७० ते ८० रुपये, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचे भाव ६० रुपयांवर पोहोचले आहेत. मध्यंतरी आलेल्या पावसामुळे भाज्यांच्या दर्जा घसरला आहे. भाज्यांसह पालेभाज्याही महाग आहेत. किरकोळमध्ये बहुतांश भाज्यांचे भाव ५० ते ८० रुपयांवर पोहोचले आहेत. जीवनावश्यक वस्तूंसह भाज्यांचे दर वाढल्याने घर कसे सांभाळायचे, असा गृहिणींचा सवाल आहे.
गरीब आणि मध्यमवर्गीयांवर आर्थिक बोझा
जीवनावश्यक वस्तूंसह सिलिंडर आणि अन्य वस्तूंचे दर आकाशाला भिडले आहेत. त्यातच डिझेलच्या महागाईची भर आहेच. भाज्यांच्या किमतीने आर्थिक बोझा वाढला आहे. कॉटन मार्केटमध्ये दररोज ६० ते ७० लहानमोठ्या गाड्यांची आवक आहे. केवळ वांगे, पत्ता कोबी, फूल कोबी, कोहळे, लवकीचे भाव कमी आहेत. जून महिन्याच्या अखेरपर्यंत जास्त भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतील, असे महात्मा फुले सब्जी व फ्रूट आडतिया असोसिएशनचे सचिव व्यापारी राम महाजन यांनी सांगितले.
महाजन म्हणाले, नागपूर शहरालगतच्या शेतीत भाज्यांचे उत्पादनात घट झाली आहे. स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांकडून केवळ ३० टक्के भाज्यांची आवक आहे. कोथिंबीर नांदेड, वाशिम, पंढरपूर, सौंसर, उमरानाला, टोमॅटो नाशिक, बेंगळुरू, बुलढाणा, हिरवी मिरची बुलढाणा, यवतमाळ, मौदा, फूल कोबीची आवक स्थानिक शेतकरी व बुलढाणा येथून होत आहे. सध्या तरी भाजीपाल्यांची अशीच आवक सुरू राहणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
भाजीपाला होलसेल भाव किरकोळ भाव
हिरवी मिरची ३० ६०
कोथिंबीर ३० ६०
टोमॅटो १५ ३०
फूल कोबी १५ ३०
पत्ता कोबी १५ ३०
वांगे २० ४०
चवळी शेंग ३० ६०
गवार ४० ७०
कारले ४० ७०
ढेमस ४० ७०
भेंडी ३० ६०
पालक २० ४०
मेथी ३० ६०
कांदे आणि बटाटे आटोक्यात
महागाईची झळ जीवनावश्यक वस्तूंसह भाज्यांनाही बसली आहे. या काळातही ग्राहकांना कांदे आणि बटाटे किफायत दरात मिळत आहेत. कळमन्यात कांदे आणि बटाट्यांची आवक वाढली असून पुरवठा आणि मागणी समप्रमाणात असल्यामुळे भाव आटोक्यात असल्याचे कळमन्यातील आलू-कांद्याचे ठोक व्यापारी भावेश वसानी यांनी सांगितले. पुढे भाव वाढणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
कळमना बाजारात दररोज १८ ते २५ ट्रक कांद्याची आवक आहे. आकोट, अंजनगाव, परतवाडा, बाळापूर, खामगाव, नांदुरा, नांदेड, जळगाव येथून लाल आणि पांढरे कांदे विक्रीस येत आहेत. दर दोन-तीन आठवड्यापासून कमी झाले आहेत. कळमन्यात लाल कांद्याचे दर १० रुपये आणि पांढरे कांदे १० ते १२ रुपये आहेत. किरकोळ बाजारात जास्त भावात विक्री होत आहे.
आता साठवलेल्या बटाट्याची आवक
मार्चपासून कोल्ड स्टोरेज (आग्रा) आणि खड्ड्यात साठवलेल्या बटाट्यांची आवक आहे. दररोज १८ ते २५ ट्रक बटाटे कळमन्यात विक्रीसाठी येत आहेत. कोल्ड स्टोरेजचा भाव दर्जानुसार १० ते १३ रुपये किलो आणि खड्ड्यातील बटाट्याचे भाव ७ ते १० रुपये आहे. किरकोळमध्ये २० ते २५ रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. कानपूर येथून लवकरच आवक सुरू होईल.