पेट्रोल-डिझेलच्या दराने किचन कोलमडले; किराणा, भाजीपाला महागला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:06 AM2021-07-05T04:06:16+5:302021-07-05T04:06:16+5:30

नागपूर : वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जवळपास ३० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचा परिणाम मालवाहतुकीवर झाल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या ...

The kitchen collapsed at the rate of petrol-diesel; Groceries, vegetables are expensive! | पेट्रोल-डिझेलच्या दराने किचन कोलमडले; किराणा, भाजीपाला महागला !

पेट्रोल-डिझेलच्या दराने किचन कोलमडले; किराणा, भाजीपाला महागला !

Next

नागपूर : वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जवळपास ३० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचा परिणाम मालवाहतुकीवर झाल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वधारल्या आहेत. एकंदरीत महागाईचा भडका उडाला आहे. किराणा वस्तूंसह भाजीपाल्याच्या किमतीही आकाशाला भिडल्या आहेत. आता सर्वच भाज्यांचे दर ५० रुपये किलोवर पोहोचले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत ५०० रुपयांच्या भाज्या एका थैलीत येत आहेत. किराणा वस्तू आणि भाजीपाल्याचे भाव ऐकून गरीब व सामान्यांना घाम फुटत असल्याची परिस्थिती आहे. त्यातच तूर डाळींसह अन्य डाळींचेही भाव वाढले आहेत. खाद्यतेलात अतोनात वाढ झाली आहे. दररोज मजुरी कमावून स्वयंपाकघरातील वस्तू खरेदी करताना गरिबांच्या नाकीनव येत आहे. एकंदरीतच पेट्रोल-डिझेलच्या दराने किचन कोलमडले असून किराणा आणि भाजीपाला महागला आहे.

कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेल्याने त्यांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. महागाईने कहर केल्याने कुटुंबीयांचा दैनंदिन खर्च कसा पूर्ण करायचा, हे संकट त्यांच्यासमोर उभे राहिले आहे. महागाईवर नियंत्रण आणण्यात केंद्र आणि राज्य शासनही पुढाकार घेत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी अनेक ग्राहक संघटनांनी शासनाला निवेदने दिली आहेत. शासन महागाई कमी करण्यासाठी काहीच पावले उचलत नाही, असा ग्राहक संघटनांचा आरोप आहे.

ट्रॅक्टरची शेतीही महागली

पेट्रोलप्रमाणे डिझेलची शंभरीकडे वाटचाल सुरू असून, वर्षभरात जवळपास प्रति लिटर ३० रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात ट्रॅक्टरची शेतीही महागली आहे. ट्रॅक्टरचा अ‍ॅव्हरेज कमी असल्याने शेतीच्या झटपट मशागतीसाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरही परवडत नाही. डिझेलच्या भडक्यामुळे आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चालविणे कठीण झाले आहे. त्यांना पुन्हा बैलजोडीची आठवण येत आहे. सामान्य शेतकरी ट्रॅक्टरच्या मशागतीला नकार देत आहेत.

फूल कोबी ६० रुपये किलो

भाज्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, महिन्यापूर्वी किरकोळमध्ये ३० रुपये किलो असलेले फूलकोबीचे भाव ६० रुपयांवर गेले आहेत. सध्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामावर लक्ष्य केंद्रित करून भाज्यांकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी भाज्या वधारल्या आहेत. सध्या ठोक बाजारात आवक कमी झाली आहे. गृहिणींना आणखी दोन महिने महाग भाज्या खरेदी कराव्या लागतील.

भाजीपाल्याचे दर (ग्राफ)

टमाटा ३०

शेवगा ८०

कोथिंबीर ८०

चवळी शेंग ५०

मेथी ८०

डाळ आटोक्यात, तेल महाग

सरकारने आयात खुली केल्याने महिन्यापासून सर्वच डाळींच्या किमतीत घसरण झाली आहे. तूरडाळ दर्जानुसार ९० ते १०५, चना डाळ ६० ते ६५ आणि उडद, मसूर डाळींच्या किमतीत घट झाली आहे. एक महिन्यात खाद्यतेलाच्या किमतीत घसरण झाली असली तरीही नोव्हेंबर-२० च्या तुलनेत भाव जास्तच आहे. नोव्हेंबरमध्ये ९५ रुपये किलो असलेले सोयाबीन तेलाचे दर १५५ रुपयांवर आहेत. शिवाय शेंगदाणा १६८, पामोलिन १५५, जवस १७०, एरंडी १३५, राईस ब्रान १३८, मोहरी १५५, सूर्यफूल १७० रुपये भाव आहेत.

व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया :

गेल्या दोन महिन्यांत किराणा वस्तूंचे दर महाग झाले आहेत. त्याची झळ गरीब व सर्वसामान्यांना बसत आहे. ही बाब सत्य आहे. ग्राहकांचा किरकोळ विक्रेत्यांवर रोष असतो, पण आमचा नाईलाज आहे. ठोक व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेला माल थोडा नफा कमावून विक्री करतो. नियंत्रणासाठी शासनाने पुढाकार घ्यावा.

प्रभाकर देशमुख, किराणा व्यापारी

कॉटन मार्केट उपबाजारात गेल्या पंधरा दिवसांपासून भाज्यांची आवक कमी असल्याने भाववाढ झाली आहे. भाववाढीने ग्राहक त्रस्त आहे. नवीन उत्पादन बाजारात येईस्तोवर ग्राहकांना पुढील दोन महिने भाज्या जास्त भावातच खरेदी कराव्या लागतील. दरवर्षी या काळात भाज्या महागच असतात, असा अनुभव आहे.

राम महाजन, भाजीपाला विक्रेते

घर चालविणे झाले कठीण :

किराणा वस्तू, खाद्यतेल, भाजीपाल्यासह स्वयंपाकघरातील सर्वच वस्तू महाग झाल्याने महिन्याचे बजेट कोसळले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीसह या महिन्यात सिलिंडरचेही दर वाढले आहे. कोरोनामुळे उत्पन्न कमी झाले तर त्या तुलनेत खर्च वाढला आहे. भाज्यांच्या किमती वाढल्याने कडधान्यावर भर द्यावा लागत आहे. महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने कठोर उपाययोजना कराव्यात.

रश्मी हरडे, गृहिणी

स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्याची महिलांची शासनाकडे मागणी आहे. पण शासन मूळ गिळून बसले आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, डाळी, धान्य, किराणा वस्तूंचे भाव आकाशाला भिडले आहेत. वाढलेले भाव कमी होण्याची आता शक्यता नाही. दुसरीकडे कोरोनामुळे उत्पन्न कमी झाले आहे. मुलांचा शिक्षणाचा खर्च वाढला आहे. महागाईला कसे तोंड द्यायचे, हा गंभीर प्रश्न गृहिणींसमोर आहे.

स्वाती शिरपूरकर, गृहिणी

असे वाढले पेट्रोल-डिझेलचे दर

पेट्रोल डिझेल

जानेवारी २०१८ ७९.५४ ६७.८२

जानेवारी २०१९ ७५.१० ६६.१५

जानेवारी २०२० ८१.२७ ७१.८४

जानेवारी २०२१ ९०.५५ ७९.५५

फेब्रुवारी ९३.६८ ८८.२०

मार्च ९७.३७ ८७.०९

एप्रिल ९६.६३ ८६.३२

मे ९६.८० ८६.५३

जून १००.३३ ९१.१६

जुलै १०५.४१ ९५.२८

Web Title: The kitchen collapsed at the rate of petrol-diesel; Groceries, vegetables are expensive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.