पतंगबाजी : नागपुरात १०० हून अधिक पक्षी नायलॉन मांजाचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:31 PM2020-01-15T23:31:25+5:302020-01-15T23:32:13+5:30

एकीकडे नायलॉन मांजामुळे २० च्यावर माणसे गंभीर जखमी झाली असताना पक्ष्यांवरही संक्रांत बरसली आहे. वनविभागाच्या अंदाजानुसार मकरसंक्रांतीच्या एकाच दिवसात १०० पेक्षा अधिक पक्ष्यांचा बळी गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Kite-bashing: More than 100 birds become victims by nylon manza in Nagpur | पतंगबाजी : नागपुरात १०० हून अधिक पक्षी नायलॉन मांजाचे बळी

पतंगबाजी : नागपुरात १०० हून अधिक पक्षी नायलॉन मांजाचे बळी

Next
ठळक मुद्देउपचार केंद्रात ३० कबुतर, बगळे, घुबड, कोकीळ घारीवर उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बंदी असूनही सर्रासपणे झालेल्या नायलॉन मांजाच्या विक्रीमुळे अपेक्षेप्रमाणे व्हायचे ते दुष्परिणाम झालेच. एकीकडे नायलॉन मांजामुळे २० च्यावर माणसे गंभीर जखमी झाली असताना पक्ष्यांवरही संक्रांत बरसली आहे. वनविभागाच्या अंदाजानुसार मकरसंक्रांतीच्या एकाच दिवसात १०० पेक्षा अधिक पक्ष्यांचा बळी गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यापेक्षा अधिक जायबंदी झाले आहेत. दरम्यान वनविभागाने सुरू केलेल्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दिवसभरात ५० च्यावर जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यात आले.
वनविभागाच्या ट्रान्झिट सेंटरचे पक्षितज्ज्ञ डॉ. मयूर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार विभागाच्या आपात्कालीन संपर्क क्रमांकावर ६० च्यावर जागेहून पक्ष्यांच्या अपघाताबाबत माहिती आली. या पक्ष्यांना पक्षिमित्र कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेस्क्यू करण्यात आले. त्यातील ५० च्यावर पक्ष्यांवर सध्या केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत. यात कबुतर, घुबड व घारींची संख्या अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ट्रान्झिट केंद्रात ३० कबुतर, १० ते १२ बगळे, ४ घारींवर उपचार करण्यात आले. याशिवाय घुबड, कोकीळ, पोपट, शिक्रा आदी पक्ष्यांवरही उपचार करण्यात आल्याची माहिती डॉ. काटे यांनी दिली. नायलॉन मांजा झाडावर अडकला असल्याने रात्री भ्रमंती करणारे घुबड आणखी जखमी होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. यामधील किरकोळ जखमी झालेल्या काही पक्ष्यांना उपचारानंतर सोडून देण्यात आले. मात्र गंभीर जखमी असलेल्या पक्ष्यांना सेंटरमध्येच ठेवण्यात आले आहे. गंभीर असलेल्या काही पक्ष्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. साधारणत: महिनाभर त्यांच्यावर औषधोपचार करून ते सक्षम झाल्यावर त्यांना सोडून देण्यात येणार असल्याचेही डॉ. काटे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान एवढ्या पक्ष्यांवर उपचार सुरू असले तरी अनेक पक्षी जायबंदी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत पक्ष्यांचा आकडा आज मिळू शकला नसला तरी १०० हून अधिक पक्ष्यांचा बळी गेला असण्याची आणि यापेक्षा दुपटीने जायबंदी झाले असण्याची भीती डॉ. काटे यांनी व्यक्त केली. मकरसंक्रांतीनंतर गुरुवारी याबाबत माहिती मिळेल, अशी शक्यता त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

 

Web Title: Kite-bashing: More than 100 birds become victims by nylon manza in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.