प्रामाणिक पतंग विक्रेत्यांची ‘ओ पारऽऽ..’; व्यवसायावरच ‘संक्रांत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 07:10 AM2022-01-11T07:10:00+5:302022-01-11T07:10:02+5:30
Nagpur News प्रतिबंधित मांजा आणि पतंगाची अवैध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमुळे पतंगाचा परंपरागत व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचा धंदा यंदा अर्ध्याच्याही खाली आहे.
नागपूर : डिसेंबरच्या अखेरपासून पतंग बाजारात रौनक येते. मात्र यंदा हे विक्रेत चिंतित आहेत. अवैध नायलॉन मांजा व प्लास्टिक पतंग विक्रेत्यांमुळे ग्राहक बाजारात येत नसल्याने अद्याप ५० टक्केसुद्धा व्यवसाय झाला नसल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. प्रतिबंधित मांजा आणि पतंगाची अवैध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमुळे पतंगाचा परंपरागत व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचा धंदा यंदा अर्ध्याच्याही खाली आहे.
संक्रांतीला चार दिवस उरले असतानाही अद्याप पतंग व्यवसायाचा ग्राफ चढलेला नाही. आकाशात दिसणाऱ्या कमी संख्येतील पतंगांवरूनच याचा अंदाज येत आहे. भरीसभर पावसाळी आणि ढगाळ वातावरणामुळेही व्यवसाय मंदावला आहे.
इतवारी व जुनी शुक्रवारी मोठी बाजारपेठ
नागपुरात जुनी शुक्रवारी, महाल, इतवारी, जरीपटका या भागात पतंग आणि मांजाची सर्वाधिक विक्री होते. या सणात नागपुरात १० ते १२ कोटींचा व्यवसाय होतो. इतवारी ठोक बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत अपेक्षेपेक्षा कमी विक्री झाली आहे. आता सर्वत्र पतंग आणि मांजाची दुकाने सजली आहेत. पण ग्राहकी नसल्यामुळे बाजारात चैतन्य नाही. बाजारात दोन दिवसापूर्वी उत्साह संचारेल, असे पतंगांचे व्यापारी रूपलाल शाहू यांनी सांगितले. पोलिसांनी आतापर्यंत लाखो रुपयांचा नायलॉन मांजा व प्लास्टिक पतंग जप्त केली आहेत. आता कारवाई टाळण्यासाठी व्यापारी नायलॉन मांजा आणि प्लास्टिक पतंगाऐवजी कागदी पतंग आणि बरेलीच्या सूती मांजा विक्रीला पसंती देत आहे. नायलॉन मांजा नसल्याचे उत्तर प्रत्येक दुकानदाराकडून मिळत आहे.
ठराविक लोकांनाच मिळताहेत नायलॉन मांजा
पोलीस आणि मनपाने लाखो रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केल्यानंतर अवैध व्यापारी सजग झाले आहेत. ओळखीच्या लोकांनाच या मांजाची विक्री करण्यात येत आहे. या मांजाची ३०० रुपयांची एक चक्री अवैधपणे ७०० रुपयांपर्यंत मिळत आहे. बाजारात विविध आकार आणि विशिष्ट ब्रॅण्डच्या पतंग विक्रीला आहेत, पण खरेदीदार नसल्यामुळे व्यापारी नाराज आहेत. बाजारात एक रिल अर्थात ९०० मीटर मांजामध्ये सहा तार मांजाची चक्री १२० ते १५० रुपये, नऊ तार २५० ते ३०० रुपये आणि बारा तार मांजा ३०० रुपयापासून आहेत.
बरेली मांजा पर्यावरणपूरक
पतंग विक्रेते म्हणाले, नायलॉन मांजाऐवजी बरेली मांजा पर्यावरणपूरक आहे. बरेली मांजा आणि कागदाच्या पतंग नष्ट होतात. त्यामुळे अनेक वर्षांपासून बरेली मांजा व कागदी पतंगाच्या विक्रीला प्राधान्य देतो. पण काही वर्षांपासून नायलॉन मांजाच्या विक्रीवर प्रतिबंध असतानाही काहीच विक्रेते या मांजाची विक्री करतात. त्यांच्यावर होणाऱ्या कारवाईचे समर्थन आहे. ही मोहीम अधिक तीव्रतेने राबविल्यास पारंपरिक पतंग व मांजाच्या विक्रीला सुगीचे दिवस येतील.