नागपुरात लुटारू महिलेने घातले चाकूचे घाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 08:19 PM2018-05-25T20:19:25+5:302018-05-25T20:19:36+5:30
लुटारू महिला आरोपीने एका व्यक्तीवर चाकूचे घाव घालून त्याच्याजवळचे १२०० रुपये हिसकावून घेतले. भोजराज दशरथ बागडे (वय ५२) असे लुटारूंच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते पारशिवनी (जि. नागपूर) जवळच्या आमडी मोहल्ल्यातील रहिवासी आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लुटारू महिला आरोपीने एका व्यक्तीवर चाकूचे घाव घालून त्याच्याजवळचे १२०० रुपये हिसकावून घेतले. भोजराज दशरथ बागडे (वय ५२) असे लुटारूंच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते पारशिवनी (जि. नागपूर) जवळच्या आमडी मोहल्ल्यातील रहिवासी आहेत.
बागडे यांची मुलगी राजस्थानमध्ये राहते. मुलीच्या गावाला जाण्यासाठी बुधवारी रात्री बागडे नागपूर रेल्वेस्थानकावर आले. मात्र, राजस्थानला जाणारी रेल्वेगाडी गुरुवारी दुपारी असल्याचे कळल्याने त्यांनी रेल्वेस्थानकावरच रात्र काढली. गुरुवारी सकाळी ९ वाजता ते चहा घेण्यासाठी गणेशपेठेतील राम मंदिराकडे आले. या भागातील बरीचशी दुकाने उघडायची होती. अचानक एक महिला तिच्या साथीदारासोबत बागडेंच्या समोर आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून बागडेंच्या खिशातून जबरदस्तीने रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. बागडेंनी जोरदार प्रतिकार केला. ते पाहून आरोपी महिलेने तिच्या जवळचा चाकू बागडेंच्या डोक्यावर आणि पोटरीवर मारून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी बागडेंच्या खिशातील १२०० रुपये हिसकावून पळ काढला. जखमी बागडेंनी रस्त्यावरच्या नागरिकांच्या मदतीने पोलिसांना कळविले. नंतर मेयोत गेले. तेथे उपचारानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी लुटमार आणि प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.