'हे' आहे चित्ता शावकांच्या मृत्यूचे कारण...; अभ्यासातील वास्तव 

By निशांत वानखेडे | Published: May 28, 2023 07:09 PM2023-05-28T19:09:52+5:302023-05-28T19:10:05+5:30

वर्षभरापूर्वी नामिबियामधून आणलेल्या आणि मध्य प्रदेशच्या कुनो अभयारण्यात ठेवलेल्या चित्त्याच्या तीन शावकांच्या मृत्युमुळे वेगवेगळ्या शंकाकुशंका उपस्थित होत आहेत.

know here the cause of death of cheetah cubs | 'हे' आहे चित्ता शावकांच्या मृत्यूचे कारण...; अभ्यासातील वास्तव 

'हे' आहे चित्ता शावकांच्या मृत्यूचे कारण...; अभ्यासातील वास्तव 

googlenewsNext

नागपूर : वर्षभरापूर्वी नामिबियामधून आणलेल्या आणि मध्य प्रदेशच्या कुनो अभयारण्यात ठेवलेल्या चित्त्याच्या तीन शावकांच्या मृत्युमुळे वेगवेगळ्या शंकाकुशंका उपस्थित होत आहेत. चित्त्यांची प्रजाती भारतात टिकणारच नाही, अशी मते व्यक्त केली जात आहेत. मात्र चित्ते जगणार नाही, अशी भविष्यवाणी करणे चुकीचे आहे, असे मत चित्ता लेडी म्हणून प्रसिद्ध डॉ. प्रज्ञा गिरडकर यांनी व्यक्त केले. मात्र सध्या ते देखरेखीखाली बंदिवासात असून तेच त्यांच्या मृत्युचे कारण असल्याचे त्यांनी एका संशोधनावरून नमूद केले आहे. डॉ. प्रज्ञा गिरडकर या भारताच्या पहिल्या चित्ता संरक्षण म्हणून ओळखल्या जात असून नामिबियामध्ये राहून त्यांनी चित्त्यांच्या हालचालीवर अभ्यास केला आहे. त्यांनी अनुवंश शास्त्रज्ञ डॉ. स्टिफन ओब्रायन व डॉ. लॉरी मार्कर यांनी १९८५ साली सादर केलेल्या संशोध अहवालात चित्ता शावकांच्या मृत्युचे कारण नोंदविले आहे. वेगवेगळे वनक्षेत्र व चित्त्यांच्या अधिवासात शावकांच्या हालचालींचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या संशोधनानुसार बंदिवासात देखरेखीखाली असलेल्या चित्त्यांच्या शावकांचा मृत्युदर ७० टक्क्यांच्या वर असतो.

कुनो अभयारण्यात असलेल्या ज्वाला’ नामक मादी चित्त्याचे हे शावक असून आता केवळ एक शावक जिवंत राहिला आहे. डॉ. गिरडकर यांनी सांगितले चित्ता ही अतिशय संवेदनशील प्रजाती आहे. त्यांच्यामध्ये अनुवांशिक विविधता कमी असते. त्यामुळे तो अतिसंवेदनशील गटात गणला जातो. कधीकाळी एकट्या भारतात १०,००० चित्ते होते पण शिकारीमुळे त्यांचे अनैसर्गिक मृत्यु झाले व ही प्रजाती भारतातून नामशेष झाली. आता जगभरात केवळ ७००० चित्ते शिल्लक आहेत. गेल्या वर्षी नामिबियामधून चित्ते आणून एक प्रयोग केला जात आहे.  गिरडकर यांच्या मते आफ्रिकेत वाळवंटी प्रदेशात दिवसा अतिउष्णता व रात्री अति थंडी असते. अशा वातावरणात राहणारे चित्ते भारतीय वातावरणात रुळायला निश्चितच वेळ लागेल. बंदिवासात असल्याने त्यांना मुक्त संचार करण्यासाठी वाव मिळत नाही. त्यांच्यात हवी तशी रोगप्रतिकारशक्ती वाढत नाही. मात्र सध्यातरी या पाहुण्यांनी भारतीय वातावरणाशी जुळवून घेतले असून नैसर्गिक अधिवासात गेल्यानंतरच त्यांच्यातील प्रतिकारशक्ती वाढेल आणि या वातावरणात टिकून राहण्याची त्यांची क्षमता समजेल, असा विश्वास डॉ. गिरडकर यांनी व्यक्त केला.


 

Web Title: know here the cause of death of cheetah cubs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर