जाणून घ्या, तुमचे ‘लॉकर’ खरंच किती सुरक्षित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 09:46 AM2017-11-23T09:46:48+5:302017-11-23T09:47:35+5:30

नवी मुंबईच्या जुईनगरमध्ये चोरट्यांनी भुयार खणून ३.२८ कोटीचा ऐवज लुटून नेल्यानंतर लॉकरच्या सुरक्षेबद्दल मोठे प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. यासंबंधी रिझर्व्ह बँकेचे नियम जाणून घेण्यासाठी लोकमतने रिझर्व्ह बँकेच्याच एका सेवानिवृत्त मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व त्यांच्याकडून प्राप्त झालेली माहिती वाचकांसाठी देत आहोत.

Know, how safe is your 'locker'? | जाणून घ्या, तुमचे ‘लॉकर’ खरंच किती सुरक्षित?

जाणून घ्या, तुमचे ‘लॉकर’ खरंच किती सुरक्षित?

googlenewsNext
ठळक मुद्देकाय आहेत रिझर्व्ह बँकेचे नियम?

सोपान पांढरीपांडे।
आॅनलाईन लोकमत
नागपूर : नवी मुंबईच्या जुईनगरमध्ये चोरट्यांनी भुयार खणून बँक आॅफ बडोदाच्या लॉकर रूममध्ये प्रवेश करून ३.२८ कोटीचा ऐवज लुटून नेल्यानंतर लॉकरच्या सुरक्षेबद्दल मोठे प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. यासंबंधी रिझर्व्ह बँकेचे नियम जाणून घेण्यासाठी लोकमतने रिझर्व्ह बँकेच्याच एका सेवानिवृत्त मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व त्यांच्याकडून प्राप्त झालेली माहिती वाचकांसाठी देत आहोत. हल्ली रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे बनविलेल्या लॉकर रूम्स भारतातही तयार होतात. त्यात गोदरेज, येल, ओझोन, स्टील एज, रोलेक्स, मीरा अरबिंदो या कंपन्या आघाडीवर आहेत.


लॉकरधारकांनी काय करावे?
लॉकरचा व्यवसाय हा पतसंस्था/नागरी सहकारी बँका/  बँका/खासगी बँका यासाठी दुहेरी फायद्याचा असतो. कारण लॉकरसाठी या सर्व संस्थांना ग्राहकांकडून ठेवी मिळतात व लॉकरचे भाडेही मिळते. त्यामुळे बहुसंख्य पतसंस्था, नागरी बँका, सरकारी व खासगी बँका व खासगी कंपन्या लॉकरचा व्यवसाय करतात अशी माहिती सहकारी बँकांचे कन्सल्टंट दिलीप मुलमुले यांनी दिली. लॉकरधारकांनी आपल्या पतसंस्थेने/बँकेने अथवा लॉकर कंपनीने हे नियम पाळले आहेत की नाही याची त्वरित शहानिशा करावी व उचित निर्णय घ्यावा, असे आवाहनही मुलमुले यांनी केले.


रिझर्व्ह बँकेचे स्ट्राँगरूम व लॉकर रूमसाठी नियम-
स्ट्राँग रूम/लॉकर रूमसाठी निवडलेल्या जागेला तिन्ही बाजूंनी सिमेंट काँक्रिटच्या भिंती बांधून मुख्य इमारतीपासून वेगळे करणे आवश्यक आहे. शिवाय लॉकर रूमचा तळ सिमेंट अथवा १८ मि.मी. लोखंडी प्लेटचा असणे आवश्यक आहे.
सिमेंट काँक्रिटच्या या भिंतीची जाडी कमीत कमी एक फूट असणे आवश्यक आहे.
स्ट्राँग रूम/लॉकर रूमचा दरवाजा १ मीटर (३.२५ फूट) पेक्षा अधिक नको व दरवाजाला दोन्हीकडून सरकत जाणारी लोखंडी ग्रिल असणे आवश्यक आहे. हा दरवाजा फक्त २१ इंच उघडा ठेवावा व एकावेळी एकच व्यक्ती आत/बाहेर जाऊ शकेल.
लॉकर रूमचा दरवाजा जनतेला दिसणार नाही असा झाकलेला असावा.
लॉकर रूममध्ये बँक अधिकारी व ग्राहक अशा दोनच व्यक्ती एकावेळी उपस्थित असाव्यात. लॉकर दोन चाब्यांनी उघडणारे असावे. यापैकी एक चाबी ग्राहकाकडे व दुसरी बँकेकडे असावी. संपूर्ण लॉकर रूममध्ये अलार्म सिस्टिम असणे व तिचा आवाज १ कि.मी. पर्यंत ऐकू येणे आवश्यक आहे.
लॉकर रूम असणाऱ्या इमारतीत आत व बाहेर सीसीटीव्ही लावणे आवश्यक आहे.
संपूर्ण इमारतीसमोर सशस्त्र सुरक्षा रक्षक २४ तास असणे आवश्यक आहे.
लॉकरचा आकार अ श्रेणीसाठी ४.५ इंच ५.७५ इंच २०.७५ इंच तर छ/ङ श्रेणीसाठी १५.५ इंच १९.७५ इंच २०.७५ इंच असावा. लॉकर रूम वेगळी असेल तर तळ व बाजूच्या भिंती व दरवाजा १८ मिमी लोखंडी प्लेटचा असणे आवश्यक.


कडक नियम का?
इंडियन कॉन्ट्रॅक्ट अ‍ॅक्टच्या कलम १५२ प्रमाणे लॉकरच्या बाबतीत बँक/लॉकर कंपनी व ग्राहक यांचे नाते घरमालक व भाडेकरूचे निश्चित केले आहे. त्यामुळे लॉकर फोडून चोरी झाली तरी ग्राहकाच्या नुकसानीसाठी बँक/लॉकर कंपनी जबाबदार नसते. म्हणून चोरी होऊच नये म्हणून एवढे कडक सुरक्षा नियम रिझर्व्ह बँकेने घालून दिले आहेत, अशी माहिती वर्धमान नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष व चार्टर्ड अकाऊंटंट अनिल पारख यांनी दिली.

Web Title: Know, how safe is your 'locker'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.