समाजातील वास्तव जाणून घ्या!

By admin | Published: February 9, 2016 02:47 AM2016-02-09T02:47:05+5:302016-02-09T02:47:05+5:30

आयुष्यात स्वप्न रंगविणे चुकीचे नाही. मात्र ते स्वप्न रंगवितांना आयुष्यातील खरे सुख कशात आहे, ...

Know the Reality in the Community! | समाजातील वास्तव जाणून घ्या!

समाजातील वास्तव जाणून घ्या!

Next

‘जशपूर’ यात्रेचा समारोप : विनोद तावडे यांचे आवाहन
नागपूर : आयुष्यात स्वप्न रंगविणे चुकीचे नाही. मात्र ते स्वप्न रंगवितांना आयुष्यातील खरे सुख कशात आहे, याचाही विचार करा. आयुष्यातील खऱ्या सुखाची कल्पना काय? हे आपणच ठरविले पाहिजे. स्वत:ची ओळख स्वत:च करून, समाजातील वास्तवतेची जाणीव करून घ्या, असे आवाहन राज्याचे शालेय व वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले.
‘सेवांकुर’ या संस्थेच्यावतीने ‘एक सप्ताह देश के नाम’ या उपक्रमातर्गंत अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानच्या सहकार्याने आयोजित ‘जशपूर’ यात्रेचा सोमवारी समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात हा कार्यक्रम झाला. प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ शल्यचिकित्सक तथा लातूर येथील विवेकानंद रुग्णालयाचे मार्गदर्शक डॉ. अशोकराव कुकडे होते. मंचावर खासदार डॉ. हिना गावित, सेवांकुर संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधीर टोमे, सचिव डॉ. सचिन जांभोरकर, डॉ. नितीन गादेवाड व डॉ. अनंत पंढरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ‘सेवांकुर’ या संस्थेच्यावतीने मागील २ ते ८ फेब्रुवारीदरम्यान वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी छत्तीसगडमधील अतिदुर्गंम भागातील ‘जैसपूर’ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, यात राज्यभरातील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. समारोप कार्यक्रमात त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले. संचालन डॉ. प्रणाम सदावर्र्ते यांनी केले.(प्रतिनिधी)

‘सेवांकुर’ च्या संकेतस्थळाचे लोकार्पण
शालेय व वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते ‘सेवांकुर’ संस्थेच्या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. या संकेतस्थळावर संस्थेच्या मागील दहा वर्षांतील वाटचालीसह संस्थेच्यावतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि कार्याची माहिती देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी संकल्प करावा
डॉ. अशोकराव कुकडे यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, समाजाप्रती आपली काही जबाबदारी असून, ती पूर्ण करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. सोबतच त्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे खरे पुस्तक हे रुग्ण असून, विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाऐवजी रुग्णांकडे अधिक लक्ष द्यावे, असा सल्ला दिला.

Web Title: Know the Reality in the Community!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.