फडणवीसांवर टीका करण्याआधी आपले कर्तृत्व जाणून घ्या, परिणय फुकेंची उद्धव ठाकरेंवर टीका
By कमलेश वानखेडे | Updated: August 1, 2024 20:22 IST2024-08-01T20:22:16+5:302024-08-01T20:22:57+5:30
आ. परिणय फुके यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केले ते व्यंगचित्र

फडणवीसांवर टीका करण्याआधी आपले कर्तृत्व जाणून घ्या, परिणय फुकेंची उद्धव ठाकरेंवर टीका
नागपूर : उबाठा गटाचे उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देत भाजपाचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी आपल्या अधिकृत समाजमाध्यमांवरून वरून एक व्यंगचित्र प्रसारित केले आहे. आपण कोण आहोत, आपले एकूण कर्तृत्व का, याची थोडीही जाणीव नसताना उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर ही टीका केली असल्याचा टोला फुके यांनी लगावला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘एकतर तू राहशील किंवा मी राहीन ’ असा एकेरी उल्लेख करत टीका केली होती. उध्दव ठाकरेंच्या या टीकेला भाजपकडून जोरदार प्रतिउत्तर दिले जात आहे. अशातच आ. फुके यांनी आपल्या अधिकृत फेसबुक या समाजमाध्यमावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे एक व्यंगचित्र प्रसारित केले आहे.
यामध्ये उद्धव ठाकरे हे एका बिळातून बाहेर येऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतानाचे व्यंग दाखवण्यात आले आहे. तसेच शिल्लक गटाचे उद्धव राव, असा आशयाचा मजकूर देखील त्यांनी यावेळी व्यंगचित्रासमवेत प्रसारित केला आहे. फुके यांनी प्रसारित केलेल्या या व्यंगचित्राची राजकीय वतुर्ळात चर्चा रंगली आहे.