कायद्याची जाण व मानसिक कणखरपणा आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:07 AM2021-03-27T04:07:27+5:302021-03-27T04:07:27+5:30

नागपूर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येने वनविभागाला हादरवून साेडले आहे ...

Knowledge of law and mental toughness required | कायद्याची जाण व मानसिक कणखरपणा आवश्यक

कायद्याची जाण व मानसिक कणखरपणा आवश्यक

Next

नागपूर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येने वनविभागाला हादरवून साेडले आहे तर सामाजिक व कार्यालयीन व्यवस्थेवरही सवाल उभा केला आहे. दीपाली या डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखल्या जात हाेत्या. तरीही त्यांनी इतक्या टोकाचे पाऊल उचलावे, ही व्यवस्थाच ढासळल्याचे लक्षण आहे. लैंगिक शाेषणास नकार दिल्याने वरच्या अधिकाऱ्याकडून शारीरिक व मानसिक त्रास देण्यात येत हाेता. रात्री-बेरात्री ड्यूटीवर हजर राहण्यास सांगणे, शिवीगाळ करणे, अनावश्यक काम सांगणे, त्या गर्भवती असताना त्यांना त्रासदायक काम देणे, असे घृणास्पद प्रकार केले जात हाेते. तक्रार करूनही विभागाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसतील तर अक्षम्य बेजबाबदारपणा म्हणावा लागेल.

औद्याेगिक मानसाेपचार तज्ज्ञ डाॅ. वृषाली राऊत यांनी अशा घटनांबाबत संवेदना व्यक्त केली आहे. दुर्दैवाने कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांना असे शाेषण सर्रासपणे साेसावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पुरुषी वर्चस्व असलेल्या विभागात तर महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची छळणूक हा नेहमीचा प्रकार झाला आहे. अशावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मदतीची गरज असते पण दीपाली यांच्या प्रकरणात तसे झाले नसल्याचे दिसते. अशावेळी कामाच्या ठिकाणी हाेणाऱ्या छळाविरुद्ध असलेल्या कायद्याचे ज्ञान व मानसिक कणखरपणा अत्यंत गरजेचा असल्याची त्यांनी सांगितले. कार्यालयीन व्यवस्थेत काही गाेष्टी अगत्याने करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

- काेणत्याही विभागात नियुक्तीच्या पूर्वी कामाचा ताण हाताळण्यासाठी मानसशास्त्रीय प्रशिक्षण व मार्गदर्शन बंधनकारक करण्यात यावे. सैन्यदलात हे प्रशिक्षण अनुशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते.

- मानसिक व भावनिकदृष्ट्या कणखर असल्याची चाचणी घेणे आवश्यक करावी. पुस्तकी ज्ञानासाेबत कार्यानुभवाचे ज्ञान महत्त्वाचे.

- महिला शाेषणाच्या कायद्याबाबतचे प्रशिक्षण बंधनकारक करावे.

- वनविभागासारख्या क्षेत्रामध्ये फिल्डवर काम करावे लागत असल्याने शारीरिक व मानसिक थकवा दूर करण्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंट आवश्यक.

- गराेदर महिलेला त्रास हाेणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसा त्रास देणे हा गुन्हा आहे. विभागाने त्याची गंभीरतेने दखल घ्यावी.

- त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर अनुशासनात्मक कारवाईची व्यवस्था करणे आवश्यक.

- विभागीय सपाेर्ट आवश्यक पण सहकाऱ्यांशीही मनमाेकळी चर्चा करणे गरजेचे.

Web Title: Knowledge of law and mental toughness required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.