पक्षाने डावलल्याने कोहळे यांची नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:09 AM2021-01-23T04:09:15+5:302021-01-23T04:09:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वंजारीनगर ते अजनी पुलाचे शनिवारी लोकार्पण होणार आहे. मात्र उद्घाटन पत्रिकेत नाव नसल्यामुळे दक्षिण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वंजारीनगर ते अजनी पुलाचे शनिवारी लोकार्पण होणार आहे. मात्र उद्घाटन पत्रिकेत नाव नसल्यामुळे दक्षिण नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी खेद व्यक्त केला आहे. सातत्याने पाठपुरावा करून या पुलाला मंजुरी प्राप्त करून दिली. मात्र तरीदेखील पत्रिकेत नाव टाकण्यात आले नाही ही बाब मनाला वेदना देणारी आहे. ही भाजपची निश्चितच संस्कृती नाही. मात्र काही संकुचित विचारांच्या लोकांमुळे पक्ष कोणत्या मार्गाने चालला असा प्रश्न मनात उपस्थित होतो, अशी भावना कोहळे यांनी व्यक्त केली.
शनिवारी सायंकाळी होणाऱ्या कार्यक्रमासाठी भाजप दक्षिण नागपूरतर्फे तयार करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत उद्घाटनाला उपस्थित राहणाऱ्या नेत्यांसोबतच विद्यमान आमदार, दक्षिण नागपुरातील नगरसेवकांच्या नावाचा समावेश आहे. इतकेच काय तर भाजपच्या दक्षिण नागपूरमधील पदाधिकाऱ्यांचेदेखील नाव आहे. मात्र कोहळे यांच्या नावाचा उल्लेख नसल्यामुळे त्यांनी खेद व्यक्त केला आहे. २५ वर्षांपासून प्रलंबित असलेला मुद्दा मी पाठपुरावा करून मार्गी लावला. पुलाला रेल्वे विभाग मंजुरी देण्यास तयार नव्हता. खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नंतर चार बैठका घेतल्या. मी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर कुठे प्रकल्पाला मंजुरी मिळाली. याचे उद्घाटनदेखील थाटात झाले होते व दोन वर्षांत कामदेखील पूर्ण झाले. मात्र इतकी मेहनत करूनदेखील तसेच राज्य कार्यकारिणीत असूनदेखील माझे नाव पत्रिकेत टाकण्यात आले नाही. काही संकुचित लोकांमुळे असे प्रकार होत आहेत. मात्र संकुचित मनाने चालून कुुणी मोठा झालेला नाही. भाजप हा अटलबिहारी वाजपेयींच्या आदर्शांवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे अशा प्रकारांचे पक्षाने चिंतन करावे, असे मत कोहळे यांनी व्यक्त केले. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी शहराध्यक्ष प्रवीण दटके तसेच दक्षिण नागपूरचे अध्यक्ष देवेन दस्तुरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.