कोजागिरीचे दूध पिताय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 01:40 AM2017-10-05T01:40:05+5:302017-10-05T01:40:46+5:30
कोजागरी पौर्णिमेला खुल्या चंद्र प्रकाशात दूध आटवून पिण्याची परंपरा आहे. आकाशातून अमृताचा वर्षाव होत असल्याने हे दूध आरोग्यास लाभदायी असल्याची मान्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोजागरी पौर्णिमेला खुल्या चंद्र प्रकाशात दूध आटवून पिण्याची परंपरा आहे. आकाशातून अमृताचा वर्षाव होत असल्याने हे दूध आरोग्यास लाभदायी असल्याची मान्यता आहे. हा लाभ घेण्यासाठी आपण यंदा कोजागरी पौर्णिमा साजरी करण्याच्या बेतात असाल तर सावधान.
कारण बाजारात भेसळयुक्त दुधाची आवक वाढल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे खबरदारी न बाळगल्यास आपल्याला नुकसानसुद्धा होऊ शकते.
शहरात शुद्ध दुधाची कमतरता आहे. परंतु कोजागरीला वाढलेली दुधाची मागणी लक्षात घेता, त्यात भेसळ होण्याची शक्यता वाढली आहे. शहराला दररोज ३ ते ३.५ लाख लिटर दुधाची गरज भासते. परंतु कोजागरीच्या निमित्ताने दुधाची मागणी पाच लाख लिटरहून अधिक असते. दोन लाख लिटर अतिरिक्त दुधाची पूर्तता करण्याकरिता दुधात भेसळ होण्याची शक्यता आहे.
उघड्यावर विक्री
शहरात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध येत असतानाही, अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई दिसून येत नाही. शहरात उघड्यावर दूध विकले जात आहे. ते कुठल्या कंपनीचे आहे याची माहिती नाही. त्याचे दरसुद्धा ४० ते ५० रुपये लिटर आहे. अशा लोकांवर कारवाई करण्यास प्रशासन असमर्थ दिसत आहे.
शिंगाड्याचे पीठ व युरियाचा वापर
शहरात दुधाची पूर्तता गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात होते. परंतु गोंदियातून येणाºया दुधाच्या बाबतीत नेहमीच साशंकता राहत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यात शिंगाड्याचे पीठ व युरियाचा वापर होत असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर मनसर येथून सुद्धा अशा प्रकारच्या दुधाची शहरात पूर्तता होत असल्याचे बोलले जात आहे.
८८ टक्के दुधात भेसळ
२७ सप्टेंबर रोजी केंद्रीय अॅनिमल वेलफेअर बोर्डाचे सदस्याने खुलासा केला होता की, देशात ८८ टक्के दूध भेसळयुक्त व ६८.७ टक्के दूध हे विषारी असते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय दूध मूल्य पॉलिसी बनवावी, असे मत व्यक्त केले होेते.