चौपदरीकरणाचे मध्यवर्ती कार्यालय होणार कोल्हापुरात
By admin | Published: May 12, 2017 01:05 AM2017-05-12T01:05:21+5:302017-05-12T01:05:21+5:30
कोल्हापूर- रत्नागिरी-नागपूर महामार्ग
शोभना कांबळे । --लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रत्नागिरी (मिऱ्या) - नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या रत्नागिरीच्या हद्दीतील कामासाठी आता कोल्हापूर येथे महामार्ग प्राधिकरण कार्यालय सुरू केले आहे. कोल्हापूर कार्यालयाचे प्रकल्प संचालक म्हणून बी. एस. साळुंखे यांची नियुक्तीही केली आहे. साळुंखे यांनी प्रांताधिकारी अमित शेडगे यांची भेट घेऊन चौपदरीकरणांसदर्भातील प्रक्रियेची गुरुवारी माहिती घेतली.
रत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रक्रियेला सोलापूर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रारंभ झाला आहे. यापैकी रत्नागिरी ते आंबा घाटापर्यंतच्या चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या भूसंपादनाची जबाबदारी रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांच्याकडे देण्यात आली आहे.
सध्या या चौपदरीकरणासाठी भूसंपादनाची पहिली प्रक्रिया म्हणजे मोजणी सुरू होती. चौपदरीकरणसंदर्भातील तक्रारींचे निराकरण थेट येथील प्रशासनाला करता येत नव्हते. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालय, सोलापूर येथे संपर्क ठेवावा लागत होता. प्रशासन, नागरिकांचीही गैरसोय होत असल्यानेच हे कार्यालय रत्नागिरीत असावे, अशी मागणी होत होती. मात्र ते आता कोल्हापूर येथे केल्याने सोलापूर येथील प्राधिकरण कार्यालयाऐवजी कोल्हापूरला संपर्क करणे सर्वांचे सोयीचे होईल. सध्या संयुक्त मोजणीला प्रारंभ झाला आहे. ही मोजणी मे अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती शेडगे यांनी दिली. भूसंपादन प्रक्रियेसाठी आवश्यक अधिसूचनेकरिता ‘३ ए’ चा प्रस्ताव या शासनाकडे पाठविला होता. तो मंजूर झाला असून त्यानुसार हरकती मागविण्यात आल्या आहेत.