दुप्पट ब्लॅक मनीचा मोह दाखवून टोळीने केला व्यावसायिकांचा गेम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 10:37 AM2023-07-29T10:37:14+5:302023-07-29T10:39:28+5:30
कोंढाळी दुहेरी हत्याकांड : दीड कोटीच्या बदल्यात देणार होते २.८० कोटी : ५० लाखांची सुपारी
कोंढाळी (नागपूर) : आपल्याकडे मोठ्या प्रमाणात ब्लॅक मनी असून दीड कोटी रुपयांचा डीडी दिल्यास २.८० कोटी रुपये रोख देण्याचे आमिष दाखवून आरोपी ओंकार तलमले याने उपराजधानीतील दोन व्यावसायिकांचा गेम केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शुक्रवारी या प्रकरणात सहावा आरोपी अटक केला. सर्व आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
विशाल पुंज असे शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या सहाव्या आरोपीचे नाव आहे. तो बजरंग दलाचा कार्यकर्ता आहे. बुधवारी उपराजधानीतील दोन व्यावसायिकांचे अपहरण करून कोंढाळीनजीकच्या फार्म हाऊसमध्ये गोळ्या झाडून त्यांना ठार मारण्यात आले होते. दोघांची हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह जाळून वर्धा नदीच्या पात्रात फेकण्यात आले. अंबरीश देवदत्त गोळे (वय ४०, रा. नरकेसरी ले-आऊट, जयप्रकाशनगर) आणि निरालाकुमार जयप्रकाश सिंग (वय ४३, रा. प्रसाद अपार्टमेंट, एचबी टाऊन, पारडी) अशी मृत व्यावसायिकांची नावे आहेत. तर ओंकार महेंद्र तलमले (वय २५, रा. स्मृती ले-आऊट), लकी संजय तुर्केल (वय २२, रा. मरियमनगर), हर्ष आनंदलाल वर्मा (वय २२, रा. वाडी), दानिश दुर्गाप्रसाद शिवपेठ (वय २१, रा. गोधनी) आणि हर्ष सौदागर बागडे (वय १९, रा. दत्तवाडी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ओंकार तलमले झाला होता पुण्याला पसार
दोन्ही व्यावसायिकांना संपविण्यासाठी आरोपी ओंकार महेंद्र तलमले याने इतर पाच जणांना तयार केले. प्रत्येकाला १० लाख रुपये देण्याचे कबूल करून त्यांच्या माध्यमातून हे दुहेरी हत्याकांड घडवून आणल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. डीडीतून जमा झालेलया दीड कोटींपेक्षा एक कोटी ओंकार स्वत:कडे ठेवणार होता. दोघांची हत्या केल्यानंतर ओंकार नागपुरात आला. मैत्रिणीच्या खात्यात ही रक्कम जमा करून तो पुण्याला पसार झाला होता.
तुर्केल चालवितो जुगार अड्डा
दोन व्यावसायिकांच्या हत्येच्या घटनेत ओंकार तलमले आणि विशाल पुंज यांच्यासह सर्वच आरोपी गुन्हेगार आहेत. लक्की तुर्केल आणि त्याचे वडील अनेक वर्षांपासून गुन्हेगारीत सक्रिय आहेत. त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न यासह विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ते खून करण्यासाठी तयार झाले. तुर्केल हा जुगार अड्डा आणि क्लब चालवितो.
..असा रचना हत्येचा कट
ओंकार तलमले याला व्यसन असल्यामुळे त्याच्यावर तीन ते चार कोटींचे कर्ज झाले होते. तो नोकरी लावून देण्याची बतावणी करूनही बेरोजगारांना फसवीत होता. आरोपी ओंकारची बजरंग दलाचा पदाधिकारी विशाल पुंजसोबत मेत्री आहे. मृत व्यावसायिक निराला सिंह हेही विशाल पुंजच्या ओळखीचे असल्यामुळे तलमले याने दीड कोटीचा डीडी घेऊन रोख २.८० कोटी रुपये परत करण्याची स्कीम विशाल पुंजला सांगितली. निराला सिंह यांनी तयारी दर्शविताच तलमलेने निराला सिंह आणि अंबरीश गोळे यांच्या हत्येची योजना आखली. त्याने डीडीतून मिळालेल्या रकमेतून कुख्यात आरोपी लक्की तुर्केल आणि त्याच्या साथीदारांना ५० लाख रुपये देण्याचे कबूल केले. त्यानंतर आरोपी दोन्ही व्यावसायिकांना घेऊन फार्म हाऊसवर गेले. डीडी घेतल्यानंतर दोघांची गोळ्या झाडून हत्या केली.
शस्त्र पुरविणारा अब्दुल मूळचा बिहारचा, गुन्हे शाखेने केले जेरबंद
कोंढाळी येथे दोन व्यावसायिकांचा बंदुकीच्या गोळ्या झाडून खून केल्यामुळे खळबळ उडालेली असताना गुन्हे शाखेने या डबल मर्डरमध्ये बंदूक अन् काडतुसे पुरविणाऱ्या आरोपीला गजाआड केले आहे. अब्दुल मन्नान मोहम्मद रहमान (वय २३, रा. जयस्वाल किराणा स्टोअर्सजवळ, जगदीशनगर, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखेचे घरफोडी विरोधी पथक शुक्रवारी गस्त घालत होते. गुप्त बातमीदाराने पथकाला कोंढाळीच्या डबल मर्डरमध्ये आरोपी ओंकार तलमले याने वापरलेली बंदुक आणि काडतुसे आरोपी अब्दुलने पुरविल्याची माहिती दिली. गुन्हे शाखेने आरोपी अब्दुलचा शोध घेतला असता तो बिहार राज्यात पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याला ताब्यात घेतले असता त्याने आपण बिसनपूर पोस्ट मकवा, जि. मुंगनेर, बिहार येथील रहिवासी असल्याचे सांगितले. त्याच्या घराची झडती घेतली असता १० जिवंत काडतुसे व गुन्ह्यात वापरलेला मोबाईल असा २० हजाराचा मुद्देमाल पोलिसांना आढळला. त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र कायदा कलम ३, २५, १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी अब्दुल हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर बंदूक बाळगल्याचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी अब्दुल बिहारमधील मुंगनेर येथून स्वस्त दरात बंदुका आणि दारूगोळा आणून अधिक रक्कम घेऊन विकण्याचे काम करतो. अब्दुलने यापूर्वी कोणकोणत्या गुन्हेगारांना शस्त्रे पुरविली याचा शोध पोलिस घेत आहेत. ही कामगिरी गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मयूर चौरसिया, हवालदार राजेश देशमुख, प्रवीण रोडे, श्रीकांत उईके, प्रशांत गभणे, रवी अहिर, सुधीर सोंदरकर, कुणाल मसराम, नीलेश श्रीपात्रे, सायबर सेलचे उपनिरीक्षक बलराम झाडोकर यांनी केली.