नागपूर जिल्ह्यातल्या कोंढाळीत आहे ग्रामस्थांच्या हक्काचे ज्ञानमंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 01:10 PM2020-02-24T13:10:39+5:302020-02-24T13:12:07+5:30
काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेबद्दल असलेला जिव्हाळा इतका आहे की, ही शाळा ग्रामस्थांच्या आपुलकीचे ज्ञानमंदिर झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या बाबतीत उदासीन दृष्टिकोन दिसून येतो. शाळेच्या इमारतीपासून भौतिक सुविधेपर्यंत अशी अनेक कारणे आहेत, ज्यामुळे पालकांची मानसिकता बदलत आहे. परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या घसरत चालली आहे. पण काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे चित्र याउलट आहे. येथे पालकांचा शाळेबद्दल असलेला जिव्हाळा इतका आहे की, ही शाळा ग्रामस्थांच्या आपुलकीचे ज्ञानमंदिर झाली आहे. विशेष म्हणजे या शाळेची शतकोत्तरी वाटचाल सुरू आहे.
वीज बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्यासारखे असे अनेक प्रश्न जिल्हा परिषदेच्या शाळांना भेडसावत आहेत. पण कोंढाळीच्या जि.प. शाळेला ग्रामस्थांचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळेच ही शाळा परिसरातील खासगी शाळांवर मात करीत जिल्हा परिषदेचे अस्तित्व टिकवून आहे. गावातील अनेक पिढ्या या शाळेने संस्कारित केल्या आहेत. त्यामुळे शाळेबद्दलचा जिव्हाळा ग्रामस्थांना आहे. लोकसहभागातून शाळेत कॉन्व्हेंट सुरू करण्यात आले आहे. शाळेवर आलेल्या कुठल्याही आपत्तीला, आवश्यकतेला, भौतिक सोयीसुविधांसाठी ग्रामस्थ एकत्र येऊन लोकसहभागातून निधी गोळा करतात. या शाळेबद्दलचा जेवढा जिव्हाळा ग्रामस्थांचा आहे, तेवढाच जिव्हाळा येथील शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा आहे. मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनात आणि ग्रामस्थांच्या समन्वयातून ही शाळा प्रगतीकडे वाटचाल करीत आहे.
शाळेत शिकणारे विद्यार्थी शेतमजूर व कामगार वर्गातील आहेत. पण पहिल्या वर्गापासून येथे विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण मिळते आहे. शाळेच्या सर्व खोल्या डिजिटल करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेच्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी अध्यापनाच्या पद्धती बदलविल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून वाव दिला जात आहे.