coronavirus; नागपूर जिल्ह्यातील कोराडी मंदिर दर्शनासाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 04:07 PM2020-03-17T16:07:20+5:302020-03-17T16:07:38+5:30
शासनाने १३ मार्च रोजी लागू केलेल्या अधिसूचनेनुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज (दिनांक १७ मार्च) रात्री आरतीनंतर कोराडी जगदंबा देवी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात येत असल्याचे मंदिर प्रशासनाने कळविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आला. शासनाने १३ मार्च रोजी लागू केलेल्या अधिसूचनेनुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज (दिनांक १७ मार्च) रात्री आरतीनंतर कोराडी जगदंबा देवी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात येत असल्याचे मंदिर प्रशासनाने कळविले आहे. शासनाच्या पुढील आदेशापर्यंत मंदिर बंद राहणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी करू नये. तसेच 25 मार्चपासून सुरू होणाºया चैत्र नवरात्र महोत्सवात कोराडी मंदिरात मोठ्या प्रमाणावर होणारी भाविकांची गर्दी पाहता, तसेच राज्यात जमावबंदी कायदा लागू करण्यात आल्यामुळे श्री. महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी येथील कोराडी मंदिर हे पुढील आदेशापर्यंत दर्शनासाठी बंद करण्यात येत आहे.
दरम्यान या कालावधीत महालक्ष्मी जगदंबा मातेची नियमित होणारी पूजा, आरती, होम हवन करण्यात येणार आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मंदिरातील पुजारी व कर्मचारी यांना मास्क व सॅनिटायझर देण्यात आले आहेत. तसेच मंदिर परिसरात स्वच्छतेवर अधिक लक्ष देण्यात येत आहे. भाविकांनी पुढील आदेशापर्यंत दर्शनासाठी येणे टाळावे असे विश्वस्त मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.