कोराडी मंदिराला मिळणार जागा

By admin | Published: December 23, 2015 03:51 AM2015-12-23T03:51:59+5:302015-12-23T03:51:59+5:30

कोराडी पर्यटनस्थळ येथील कोराडी सर्व्हे क्रमांक १६४ व १६५, आराजी ९.८७ हेक्टर आर संरक्षण विभागाची जमीन....

Koradi temple will get place | कोराडी मंदिराला मिळणार जागा

कोराडी मंदिराला मिळणार जागा

Next

एकनाथ खडसे यांचे निर्देश : कामठी छावणी परिसरात नवीन बायपास मार्गाचा निर्णय
कोराडी : कोराडी पर्यटनस्थळ येथील कोराडी सर्व्हे क्रमांक १६४ व १६५, आराजी ९.८७ हेक्टर आर संरक्षण विभागाची जमीन अदलाबदलीने राज्य शासनास व त्यानंतर श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थानाला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात मंगळवारी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या देवगिरी निवासस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. सदर महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आल्याने कोराडी मंदिराला अतिरिक्त जागा मिळणार आहे.
तसेच कामठी संरक्षण विभागातील भानेगाव - वारेगाव - कामठी - घोरपड हा प्रमुख जिल्हा मार्ग ३४, या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील रस्ता संरक्षण विभागाकडे हस्तांतरित व संरक्षण विभागाच्या ताब्यातील बाह्यवळण रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरित करण्याचा या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. छावणी परिसरातील या प्रमुख मार्गाची लांबी २.५२ किमी इतकी आहे.
या बैठकीला महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, उपसचिव एम. ए. गुट्टे, कक्ष अधिकारी शेट्टे उपस्थित होते. याबाबत सर्व शासकीय संबंधित विभागाची सहमती प्राप्त झाली असून लवकरच शासकीय निर्णय काढण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. विशेष म्हणजे, या सर्व कामांकरिता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सतत प्रयत्नशील होते. या संदर्भात महसूल मंत्र्यांनी आदेश दिल्याने पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाना यश आले. कोराडी पर्यटन स्थळ विकासाकरिता अनेक योजनांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३५० कोटींचा निधी तीन टप्प्यात देण्याचे मान्य केले आहे. त्यापैकी ७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या शिखर समितीच्या बैठकीत टप्पा १ व टप्पा २ च्या एकूण १८५.२३ कोटींच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे पर्यटन स्थळ विकासामधील ९.८७ हे.आर. संरक्षण विभागातील जमिनीचा गतीरोध दूर झाल्याने विकास आराखडा पूर्ण करण्यास गती मिळणार आहे. (प्रतिनिधी)

आरोग्य उपकेंद्राच्या जागेचा मार्ग सुकर

नागपूर ग्रामीणमधील हुडकेश्वर खुर्द येथील सर्व्हे क्रमांक १०३ मधील ०.१८ हे. आर. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, दवाखाना व कर्मचारी निवासस्थानांसाठी शासकीय जमीन नागपूर सुधार प्रन्यासला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मौदा तालुक्यातील धर्मापुरी येथे सर्व्हे क्रमांक १६२ मधील १.३६ हे. आर. जमिनीपैकी ०.९६ हे.आर. जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीकरिता लवकरच मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागपूर ग्रामीणमधील सालई गोधनी येथील सर्व्हे क्र. १३५ मधील दहा हजार चौरस मीटर जागेवर त्याचप्रकारे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारत बांधकामाकरिता प्रक्रिया सुरू आहे. तसेच तेल्हारा येथील महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधीकरण यांच्या मिहान प्रकल्पाकरिता ५.४६ हे.आर. जागेसाठी प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

Web Title: Koradi temple will get place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.