कोराडीत ‘७ डी’ थिएटर उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:33 AM2017-09-25T01:33:21+5:302017-09-25T01:33:38+5:30
कोराडी येथे २५ कोटी रुपये खर्च करून ‘७ डी’ थिएटर उभारले जाईल. या थिएटरमध्ये २५ मिनिट बसून जगातील, देशातील, राज्यातील पर्यटन स्थळांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोराडी येथे २५ कोटी रुपये खर्च करून ‘७ डी’ थिएटर उभारले जाईल. या थिएटरमध्ये २५ मिनिट बसून जगातील, देशातील, राज्यातील पर्यटन स्थळांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. एवढेच नव्हे तर वीज कशी तयार केली जाते याचा प्रत्यक्ष अनुभव येथे बसून मिळेल. या प्रकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
कोराडी येथील जगदंबा माता मंदिर परिसरात रविवारी ‘कोराडी सांस्कृतिक व पर्यटन’ महोत्सवाचे थाटात उदघाटन झाले. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, महापौर नंदा जिचकार, प्रसिद्ध बॉलिवूड गायक जीत गांगुली, माजी मंत्री अॅड. सुलेखा कुंभारे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जि.प.चे माजी अध्यक्ष रमेश मानकर, माजी आ. आशिष जयस्वाल, महादुलाच्या नगराध्यक्ष सीमा जयस्वाल, कोराडीच्या सरपंच अर्चना मैंद, उपसरपंच अर्चना दिवाने आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर गायक जीत गांगुली यांच्या उपस्थितीत जगदंबा मातेची महाआरती करण्यात आली.
बावनकुळे म्हणाले, कोराडी पर्यटन विकास आराखड्यांतर्गत १८५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी पुढाकार घेतला. याशिवाय मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाढीव आराखड्यासाठी पुन्हा अतिरिक्त ३० कोटी रुपये मंजूर केले आहेत. शासनाच्या विविध विभागांनी या महोत्सवासाठी सहकार्य केले. या सांस्कृतिक सोहळ्याच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक वातावरण निर्मिती होत असल्याचे त्यांनी सांगितले.
खा. तुमाने यांनी कोराडी मंदिर परिसरात विकास होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कोराडी देवस्थान राज्यातील धार्मिक पर्यटनाचे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, कोराडी येथे आयोजित या महोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक व सांस्कृतिक मेजवानी मिळत आहे. सर्वांना सुख, शांती व समाधान लाभावे, अशी प्रार्थना त्यांनी जगदंबेच्या चरणी केली.
गाभाºयाच्या कामासाठी सहकार्य करा
मंदिर परिसराचा शासकीय निधीतून विकास केला जात आहे. मात्र, शासकीय निधीतून कोणत्याही मंदिराच्या गाभाºयाचा विकास करता येत नाही. विश्वस्त मंडळाने जगदंबा मातेच्या मंदिराचा गाभारा चांदीचा करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच मातीची मूर्ती सोन्याची केली जाणार आहे. या कामासाठी भाविकांनी दान करून मदत करावी, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.
आज सुधा चंद्रन यांचा नृत्याविष्कार
कोराडी महोत्सवात आज, सोमवारी रात्री ७ वाजता प्रसिद्ध नृत्यांगना सुधा चंद्रन या नृत्याविष्कार सादर करतील. तत्पूर्वी सायंकाळी ६.३० वाजता महाआरती होईल. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहतील. यानंतर प्रसिद्ध गायक निरंजन बोबडे यांची भावसंध्या होईल.
जीत गांगुलींच्या गीतांनी भाविक मंत्रमुग्ध
प्रसिद्ध बॉलिवूड गायक जीत गांगुली यांनी ‘जय जय कोराडी माता’ या भजनाने सुरुवात केली. उपस्थित भाविकांनी आई जगदंबेचा गजर करीत दाद दिली. यानंतर गांगुली यांनी ‘अंबे चरण कमल है तेरा’, ‘तेरी गोद मे सर है मैय्या’ आदी गीत सादर केले. यासोबत त्यांनी स्वत: संगीतबद्ध केलेले मुस्कुराने की वजह तुम हो यासह विविध गाणी सादर केली. सुनो ना संगमरमर.. हे गाणे त्यांनी हिंदीसह बंगाली भाषेतही गायले. या गाण्याला जोरदार दाद मिळाली. झी सारेगामा कोलकाताची विजेती शुभश्री देवनाथ हिने ‘पायोजी मैने रामरतन धन पायो’ या गीतासह विविध गीत सादर करीत जीत गांगुली यांना साथ दिली. पूजा व श्रद्धा हिरवडे या भगिनींनी भरतनाट्यम सादर केले.
कोराडी मातेवर ‘अल्बम’ काढणार : जीत गांगुली
यावेळी बॉलिवूड गीतकार, गायक जीत गांगुली यांनी कोराडी मातेवर एक अल्बम तयार करण्याची घोषणा केली. या अल्बममध्ये प्रसिद्ध गायक अनुराधा पौडवाल, सोनू निगम, मनोज तिवारी, अमृता फडणवीस आदी गायक जगदंबा मातेचे गीत गातील. हा अल्बम राष्ट्रीय स्तरावर नावरूपास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गांगुली यांच्या घोषणेबद्दल ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी त्यांचे आभार मानले.