‘कॉर्निया’मुक्त भारतासाठी ‘मिशन कांबा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:51 AM2017-09-03T00:51:38+5:302017-09-03T00:52:01+5:30
‘कॉर्निया’मुळे येणाºया अंधत्वावर नेत्रदानाच्या माध्यमातून मात करणे शक्य झाले आहे. मात्र नेत्रदानाच्या प्रमाणात ‘कॉर्निअल’ अंधत्व आलेल्यांचे प्रमाण खूप जास्त आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कॉर्निया’मुळे येणाºया अंधत्वावर नेत्रदानाच्या माध्यमातून मात करणे शक्य झाले आहे. मात्र नेत्रदानाच्या प्रमाणात ‘कॉर्निअल’ अंधत्व आलेल्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे देशात असे नेमके किती बाधित आहेत, याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही. यासंदर्भातच नागपुरातील ‘सक्षम’ या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेत ‘कांबा’वर (कॉर्निआ अंधत्व मुक्त भारत अभियान) भर दिला आहे. देशभरातील शाखांच्या माध्यमातून सर्वेक्षण करुन दृष्टिबाधितांची नेमकी सखोल माहिती जमा करण्यात येणार आहे.
‘कॉर्निया’ खराब झाल्यामुळे अनेकांचे जीवन अंधकारमय होते. परत प्रकाशपेरणीसाठी दुसºया व्यक्तीच्या डोळ्याच्या ‘कॉर्निया’ला बसवावे लागते. मात्र त्यासाठी त्या प्रमाणात नेत्रदानाची आवश्यकता असते. आपल्या देशात नेत्रदानाच्या प्रमाणात अद्यापही हवी तशी वाढ झालेली नाही. दुसरीकडे ‘कॉर्नियल’ अंधत्व आलेल्यांच्या आकडेवारीबाबत विविध संस्था आणि तज्ज्ञांमध्ये एकमत नाही. कुणी ही संख्या १२ लाख सांगत आहेत तर कुणी ३५ लाख. त्यामुळे देशात नेमक्या किती जणांना नेत्रदान हवे याबाबत संभ्रम आहे. याबाबतच ‘सक्षम’ या संस्थेने पुढाकार घेतला आहे. ‘सक्षम’चे देशभरात ३६० जिल्ह्यांत काम चालते. या ‘नेटवर्क’मुळे देशभरात सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुरुवातीला ६ जिल्ह्यांत ‘पायलट प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. यात मेहबूबनगर (तेलंगणा), जबलपूर (मध्य प्रदेश), कर्नाल (हरयाणा), जयपूर (राजस्थान), नवी दिल्ली आणि नागपूर या जिल्ह्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. २०२० पर्यंत देशातील सर्व जिल्ह्यांत सर्वेक्षण करण्याचा ‘सक्षम’चा मानस आहे. या सर्वेक्षणातील विस्तृत अहवाल केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाला सोपविण्यात येणार आहे. त्यानंतर नेत्रदानाला चालना देण्यासंदर्भात पुढील रुपरेषा तयार करण्याची पावले उचलण्यात येण्याची शक्यता आहे.
नेत्रदानाचे प्रमाण वाढण्याची आवश्यकता
देशात नेत्ररोगांचे प्रमाण वेगवेगळे आहे. मात्र याची कुठलीच सखोल आकडेवारी उपलब्ध नाहीत. त्यामुळेच ‘सक्षम’ने सर्वेक्षण करण्याचे पाऊल उचलले आहे. मुळात नेत्रदानाचे प्रमाण फार कमी आहे. ते वाढविण्याची आवश्यकता आहे. यासाठीच आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन ‘सक्षम’च्या राष्ट्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य शिरीष दारव्हेकर यांनी केले.