गुन्हा दाखल होताच कोथमिरेने नागपूर सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 10:00 PM2021-07-31T22:00:01+5:302021-07-31T22:00:40+5:30
Ransome case साडेतीन कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल होताच येथे कार्यरत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी शुक्रवारी नागपूर सोडले. ते चार दिवसांच्या सुटीवर नागपुरातून बाहेर गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ते नेमके कुठे गेले, ते स्पष्ट होऊ शकले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - साडेतीन कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल होताच येथे कार्यरत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी शुक्रवारी नागपूर सोडले. ते चार दिवसांच्या सुटीवर नागपुरातून बाहेर गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ते नेमके कुठे गेले, ते स्पष्ट होऊ शकले नाही.
कोथमिरे सध्या गडचिरोली-गोंदिया परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्या कार्यालयात वाचक म्हणून कार्यरत आहेत. महिनाभरापूर्वी अँटेलिया आणि नंतर घडलेल्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेनंतर वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माचे नाव आल्याने कोथमिरेंच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर एका बिल्डरने अडीच कोटींची खंडणी घेतल्याचा आरोप केल्याने कोथमिरेंचे नाव चर्चेत आले होेते. आता क्रिकेट बुकी सोनू जलान आणि केतन तन्ना यांनी दिलेल्या तक्रारीवरून साडेतीन कोटींची खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली ठाणेनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी अतिरिक्त पोलीस महासंचालक परमबीर सिंग, माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा, त्यावेळी खंडणीविरोधी पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले राजकुमार कोथमिरे यांच्यासह २८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. हे वृत्त पोलीस दलात झपाट्याने चर्चेला आले. त्यानंतर कोथमिरे नागपुरातून निघून गेले. ते चार दिवसांच्या सुटीवर गेल्याचे संबंधित वर्तुळातून पुढे आले आहे. ते नेमके कुठे गेले, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.
कोथमिरेंचा ‘नो रिस्पॉन्स’
या संबंधाने अधिक माहिती घेण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने कोथमिरे यांच्याशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.