कोराडीत आजपासून कोविड लसीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:09 AM2021-03-19T04:09:25+5:302021-03-19T04:09:25+5:30
कोराडी : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता कोराडी, महादुला येथील तपासणीची संख्या वाढविण्यात आली आहे. या क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य ...
कोराडी : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता कोराडी, महादुला येथील तपासणीची संख्या वाढविण्यात आली आहे. या क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या गुमथी येथे कोविड लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेता, उद्या शुक्रवारपासून कोराडी येथील स्वामी विवेकानंद रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सरपंच नरेंद्र धानोले व उपसरपंच आशिष राऊत यांनी दिली. लसीकरण केंद्रासंदर्भात तयारी झाली असून उद्यापासून याठिकाणी शासनाच्या निकषाप्रमाणे लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासोबतच आवश्यक सेवेत मोडणाऱ्या कोराडी येथील औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. लॉकडाऊन काळात शासकीय कार्यालयात कर्मचारी उपलब्ध ठेवण्याच्या टक्केवारीचा नियम वीज केंद्रात वापरणे शक्य होत नाही. त्यामुळे या ठिकाणी पूर्णक्षमतेने कर्मचारी उपस्थित ठेवावे लागतात. त्यामुळे वीज प्रशासनाने प्रत्येक कर्मचाऱ्याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून विभागवार कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी केली जात आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला, अशांना घरी राहण्याचे निर्देश दिले जात आहेत. वीज केंद्रात काम करणारे अधिकारी, कर्मचारी व कंत्राटी कामगारांना वयाची अट शिथिल करून कोविड लस द्यावी, अशी मागणी कामगार संघटनांनी व्यवस्थापनाकडे केली आहे.