"तुमानेंचे तिकीट कटले, आता ४० गद्दारांनी पुढचा विचार करावा", आदित्य ठाकरेंची टीका
By कमलेश वानखेडे | Published: April 2, 2024 01:16 PM2024-04-02T13:16:47+5:302024-04-02T13:17:18+5:30
Lok Sabha Elections 2024: आदित्य ठाकरे हे यवतमाळचे उमेदवार संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नागपुरात आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
नागपूर: बंडखोरी आणि गद्दारी मध्ये फरक असतो. शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांना तिकीट नाकारल्यानंतर ४० गद्दारांनी सुद्धा पुढचा विचार केला पाहिजे, जिथे जिथे गद्दारांना तिकीट मिळाली आहे, त्यांनाही असाच धडा बसणार आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी नागपुरात केली.
आदित्य ठाकरे हे यवतमाळचे उमेदवार संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नागपुरात आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, यवतमाळ मध्ये महायुतीकडून अजून उमेदवार दिला नाही. भ्रष्ट उमेदवार देणार आहे, की नवीन चेहरा येणार आहे हा प्रश्न आहे. मागील दहा वर्षात काय कामे झाले सर्वांना माहित आहे. जगात एप्रिल फुल हा दिवस साजरा होत असताना आपल्याकडे अच्छे दिन म्हणून तो दिवस साजरा होतो, आता चिमटा त्यांनी घेतला.
देशभरात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत. दिल्ली, बिहार, महाराष्ट्र, बंगाल अशी इंडिया आघाडीची बांधणी मजबूत असल्याचे दिसून येत आहे. आम्ही थेट जनतेच्या संपर्कात असून जनता आमच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशात लोकशाही संपत चाललेली आहे. संविधानाला मोठा धोका आहे. अशा काळात आम्ही सगळे एकत्र येऊन लोकशाही वाचण्यासाठी लढत आहोत, यात प्रकाश आंबेडकर यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.