नागपूर जिल्ह्यातील कृष्णा व वेणा नदी धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 11:13 AM2018-03-26T11:13:06+5:302018-03-26T11:13:17+5:30

बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील दोन कंपन्यांमधील रसायनयुक्त पाणी खुलेआम नालीत सोडले जाते. पुढे तेच पाणी नालीद्वारे वाहत कृष्णा व वेणा नदीच्या पात्रात जाते. त्यामुळे या दोन्ही नद्यांमधील पाणी तसेच परिसरातील जलस्रोत दूषित होण्याची शक्यता बळावली आहे.

Krishna and Vena river in Nagpur district are in danger | नागपूर जिल्ह्यातील कृष्णा व वेणा नदी धोक्यात

नागपूर जिल्ह्यातील कृष्णा व वेणा नदी धोक्यात

Next
ठळक मुद्देसीएटीपी प्लाँट

चंदू कावळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
 नागपूर : बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहत ही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. या वसाहतीतील दोन कंपन्यांमधील रसायनयुक्त पाणी खुलेआम नालीत सोडले जाते. पुढे तेच पाणी नालीद्वारे वाहत बुटीबोरी परिसरातून वाहणाऱ्या कृष्णा व वेणा नदीच्या पात्रात जाते. त्यामुळे या दोन्ही नद्यांमधील पाणी तसेच परिसरातील जलस्रोत दूषित होण्याची शक्यता बळावली आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराची प्रत्यक्ष पाहणी करून दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाला नोटिसा बजावल्या. परंतु, त्या कंपन्यांनी रसायनयुक्त पाणी नालीत सोडणे बंद केले नाही. ही बाब धोकादायक ठरू शकते.
या औद्योगिक वसाहतीमध्ये विविध वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. परंतु, यातील काही कंपन्या त्यांच्या आर्थिक स्वार्थासाठी कुठलाही निर्णय घेतात. येथील दोन कंपन्यांनी त्यांच्या रसायनयुक्त पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ते चक्क नालीत सोडले.
वास्तवात, या परिसरात नाल्यांचे बांधकाम पावसाने पाणी वाहून जाण्यासाठी करण्यात आले आहे. मात्र, त्यात रसायनयुक्त पाणी सोडल्या जात असल्याने ते बुटीबोरी व टाकळघाट शिवारातून वाहणाऱ्या कृष्णा व वेणा नदीच्या पाण्यात मिसळते.
विशेष म्हणजे, या वसाहतीतील बहुतांश कंपन्यांना रसायनयुक्त पाण्याची समस्या भेडसावत आहे. काही कंपन्या या रसायनयुक्त पाण्यावर ‘सीएटीपी’मध्ये प्रक्रिया करतात आणि नंतर त्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावतात. मात्र, या दोन कंपन्या त्याला अपवाद ठरल्या आहेत. त्या कंपन्या या रसायनयुक्त पाण्यावर कुठलीही प्रक्रिया न करता ते नालीद्वारे नदीत सोडतात. याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. या रसायनयुक्त पाण्याचा मुद्दा राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील अधिवेशनातही गाजला; परंतु त्यावर तोडगा निघाला नाही. ही समस्या वेळीच न सोडविल्यास ती भविष्यात घातक रूप धारण करेल, असा अंदाज काही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केला.

जीवाशी गाठ
परिसरातील जनावरे या दोन्ही नद्यांच्या पात्रात नेहमीच पाणी पित असून, पात्रातील झिरपलेले पाणी विहिरी, बोअरवेल्स व अन्य जलस्रोतात येते. पात्रातील पाणी दूषित झाल्यास इतर जलस्रोत दूषित होतात. नदीतील दूषित पाणी प्यायल्याने जनावरे दगावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या प्रकाराची केवळ थातूरमातूर चौकशी करून संबंधित कंपन्यांवर कुठलीही ठोस कारवाई कधीच करण्यात आली नाही. नदीतील पाणी दूषित झाल्यास ते सर्वांसाठीच धोकादायक ठरणार आहे.

सीएटीपी प्लाँट
या पाण्यामध्ये काही अत्यंक घातक द्रव्य मिसळलेले असतात. ते मानवी व जनावरांच्या आरोग्यासाठी तसेच वनस्पतींसाठी धोकादायक ठरतात. या रसायनयुक्त पाण्यामुळे कुणालाही धोका उद्भवू नये म्हणून काही उद्योगपतींनी त्यांच्या त्यांच्या कंपनीच्या आवारात सीएटीपी प्लाँट बसविले आहेत. रसायनयुक्त पाण्यावर या प्लाँटमध्ये प्रक्रिया केल्यानंतर त्यातील घातक द्रव्य नष्ट होतात. काही उद्योगपती केवळ पैसे वाचविण्यासाठी त्यांच्या कंपनीच्या आवारात हा प्लांट बसवित नाही.

प्रदूषण मंडळाची नोटीस
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वानखेडे यांनी या दोन्ही कंपन्यांमधील रसायनयुक्त पाण्याची पाहणी केली. त्यात कंपनी व्यवस्थापन दोषी असल्याचे आढळून येताच कंपन्यांना नोटीस बजावण्यात आल्या. परंतु, कंपनी व्यवस्थापनावर या नोटीसचा काहीही परिणाम झाला नाही. या वसाहतीतील कंपन्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी क्षेत्र अधिकारी शुक्ला यांच्याकडे आहे. हा प्रकार न थांबल्यास कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत वानखेडे यांनी दिले.

Web Title: Krishna and Vena river in Nagpur district are in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.