नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये केटी-1 वाघाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 02:48 PM2020-06-22T14:48:53+5:302020-06-22T14:59:44+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील कोलारा येथून बंदिस्त करून आणलेल्या केटी-1 या वाघाचा सोमवारी दुपारी गोरेवाडा रेस्क्यू सेंटर मध्ये मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यातील कोलारा येथून बंदिस्त करून आणलेल्या केटी-1 या वाघाचा सोमवारी दुपारी गोरेवाडा रेस्क्यू सेंटर मध्ये मृत्यू झाला. मागील आठवड्यात या वाघाने ताडोबा परिसरातील गावांमधील पाच व्यक्तींवर हल्ला करून त्यांना ठार मारले होते. त्यामुळे वनविभागाच्या आदेशानंतर या वाघाला बंदिस्त करून गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात आले होते. आज अचानकपणे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आली आहे. अधिक तपशील हाती यायचा आहे. वाघाचा शवविच्छेदन अहवाल आल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गोरेवाड्यातील कर्मचाऱ्यांना हा वाघ सकाळी मृतावस्थेत आढळला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाघ धष्टपुष्ट होता आणि त्याला कसलाही आजार नव्हता. गोरेवाडामध्ये या वाघाचे शवविच्छेदन सुरू आहे.