कुहीचा ठाणेदार गजाआड
By admin | Published: June 28, 2017 02:52 AM2017-06-28T02:52:02+5:302017-06-28T02:52:02+5:30
बार आणि रेस्टॉरंटच्या संचालकाला पाच लाखांची लाच मागून दोन लाख रुपये स्वीकारणाऱ्या कुहीचा ठाणेदार
उपनिरीक्षकही अडकला े दोन लाखांची लाच े एसीबीची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बार आणि रेस्टॉरंटच्या संचालकाला पाच लाखांची लाच मागून दोन लाख रुपये स्वीकारणाऱ्या कुहीचा ठाणेदार आणि उपनिरीक्षकाच्या एसीबीच्या पथकाने मंगळवारी रात्री मुसक्या बांधल्या. या घडामोडीमुळे पोलीस खात्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तक्रारकर्त्यांचे नागपूर जिल्ह्यातील कुही जवळ बार अॅन्ड रेस्टॉरंट आहे. महामार्गावर ५०० मीटरच्या आत असल्यामुळे हा बार बंद झाला. त्यामुळे बार मालकाने आजूबाजूची जागा खरेदी करून हॉटेलचे बांधकाम मागच्या भागात सुरू केले. त्यामुळे बाजूच्या जमीनमालकासोबत त्यांचा वाद सुरू झाला. या प्रकरणात दोन्हीकडून कुही पोलिसांकडे तक्रारी झाल्या. विरोधी जमीनमालकाच्या तक्रारीचा आधार घेत कुहीचे ठाणेदार सुभाष काळे यांनी बारमालकाला धारेवर धरले. तुमच्यावर कारवाई करतो, असा धाक दाखवून पाच लाखांची लाच मागितली. त्यामुळे मंगळवारी दुपारी बार मालकाने सरळ नागपुरात येऊन एसीबीचे अधीक्षक पी. आर. पाटील यांची भेट घेतली. पाटील यांनी तातडीने पंच पाठवून तक्रारीची शहानिशा करवून घेतली. तक्रार खरी असल्यामुळे अधीक्षक पाटील यांनी एसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद तोतरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कारवाईसाठी कुहीला पाठविले. ठरल्याप्रमाणे बार मालकाने ठाणेदार काळेंसोबत संपर्क करून लाचेची रक्कम जास्त होते, ती कमी करा, असे म्हणत लगेच रक्कम देण्याची तयारी दाखवली. काळेंनी घासाघीस करून दोन लाख रुपये पाहिजे, असे म्हटले. ही रक्कम घेण्यासाठी स्वत:सोबत पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण यालाही पुढे केले. बार मालकाने रक्कम मोठी असल्यामुळे आपल्या हॉटेलमध्ये या अन् घेऊन जा, असे सांगितले. त्यानुसार, ठाणेदार काळे आणि उपनिरीक्षक चव्हाण हे दोघे रात्री ७.३० च्या सुमारास हॉटेलमध्ये आले. त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच हॉटेलमध्ये ग्राहक म्हणून बसलेल्या एसीबीच्या पथकाने या दोघांच्या मुसक्या बांधल्या. आपण पकडले गेल्याचे लक्षात येताच ठाणेदार काळे आणि उपनिरीक्षक चव्हाण याने कारवाई टाळण्यासाठी बरीच आरडाओरड केली. मात्र, एसीबीच्या पथकाने त्यांचा विरोध हाणून पाडत त्यांना जेरबंद केले.
४० हजार घेतले
विशेष म्हणजे, पाच लाखांची लाच मागणाऱ्या ठाणेदार सुभाष काळेने तक्रारकर्त्यांना एवढे भयभीत केले की त्यांनी सोमवारी ४० हजार रुपये देऊन वेळ मारून नेली. ही रक्कम मिळाल्याने काळे आणि चव्हाण निर्ढावले. बारमालक दहशतीत आले आहे, ते आपली तक्रार करणार नाही, असा त्यांचा गैरसमज झाला. मात्र, एसीबीने जेरबंद करताच आरोपी ठाणेदार आणि उपनिरीक्षक बारमालकाकडे अक्षरश: गयावया करू लागले.
एसीबीचा चौकार
आज मंगळवारी एकाच दिवशी एसीबीने कुहीच्या ठाणेदार आणि उपनिरीक्षकासह अन्य दोघांना पकडून चौकार मारला. अन्य दोन लाचखोरात एका सेक्शन इंजिनिअरचाही समावेश आहे. या दोन कारवाया भंडारा आणि गडचिरोलीत करण्यात आल्या. भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी तक्रारकर्त्यांनी निर्धास्तपणे एसीबीच्या कार्यालयात येऊन भेटावे, असे आवाहन एसीबीचे अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे. त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, अशी ग्वाहीसुद्धा पाटील यांनी दिली आहे.