नागपूर रेल्वेस्थानकावर कुलींची रेल्वे प्रशासनाविरुद्ध नारेबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 12:04 AM2018-01-04T00:04:48+5:302018-01-04T00:08:43+5:30
आपल्या मागण्यांसाठी नागपूर रेल्वेस्थानकावरील कुलींनी सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाच्या बॅनरखाली कामबंद आंदोलन केले. कुलींनी मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या प्रशासनाविरुद्ध जोरदार नारेबाजी करून प्लॅटफार्म क्रमांक १ वरून मोर्चा काढला. हा मोर्चा सर्व प्लॅटफॉर्मवर फिरून आल्यानंतर स्टेशन मॅनेजर कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : आपल्या मागण्यांसाठी नागपूर रेल्वेस्थानकावरील कुलींनी सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाच्या बॅनरखाली कामबंद आंदोलन केले. कुलींनी मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या प्रशासनाविरुद्ध जोरदार नारेबाजी करून प्लॅटफार्म क्रमांक १ वरून मोर्चा काढला. हा मोर्चा सर्व प्लॅटफॉर्मवर फिरून आल्यानंतर स्टेशन मॅनेजर कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
कुलींच्या आंदोलनाचे नेतृत्व सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाचे पदाधिकारी अब्दुल माजिद, अजय पाल, प्रवीण नखाले, ज्ञानेश्वर पाटील, मनोज वासनिक यांनी केले. आंदोलनात बॅटरी कारवर लगेजला परवानगी देऊ नये, बिल्ला हस्तांतरणातील अडचणी दूर कराव्या, आरएमएस इमारतीतील कुली रेस्ट हाऊस सुरू करून त्यात सुविधा पुरवाव्या, चंद्रपूर आणि बल्लारशाच्या कुलींना गणवेश आणि बिल्ले द्यावे, कुलींना रेल्वेत नोकरी द्यावी आदी मागण्या आंदोलनात करण्यात आल्या. कुलींनी दुपारी ३ पासून सायंकाळी ६ पर्यंत धरणे आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेऊन विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय डॅनियल यांनी कुलींशी चर्चा केली. बॅटरी कारमध्ये लगेज नेण्याच्या निर्णयासाठी पाच दिवस लागणार असल्याचे सांगितले. याशिवाय बिल्ला हस्तांतरणातील अडचणी त्वरित दूर करण्याचे आणि कुली रेस्ट हाऊसमध्ये सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले. चंद्रपूर-बल्लारशा येथील कुलींना त्वरित बिल्ले, गणवेश देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुलींना नोकरी देण्याची बाब रेल्वे मंत्रालयांतर्गत येत असल्यामुळे प्रशासन याबाबत रेल्वे बोर्डाकडे शिफारस करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय डॅनियल यांनी दिलेल्या आश्वासनामुळे कुलींनी आपले आंदोलन मागे घेतले.