कुमार विश्वासांची उपस्थिती अन् नितीन गडकरींचा व्यासपीठावरूनच खुलासा

By नरेश डोंगरे | Published: February 6, 2023 09:33 PM2023-02-06T21:33:49+5:302023-02-06T21:35:53+5:30

३ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कुमार विश्वास जेव्हा उद्घाटन समारंभाला हजर राहिले. तेव्हा उपस्थित श्रोत्यांना एक वेगळा आनंद झाला होता.

Kumar Vishwas's presence and Nitin Gadkari's revelation in marathi sahitya sammelan | कुमार विश्वासांची उपस्थिती अन् नितीन गडकरींचा व्यासपीठावरूनच खुलासा

कुमार विश्वासांची उपस्थिती अन् नितीन गडकरींचा व्यासपीठावरूनच खुलासा

Next

नागपूर : वर्धेच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीत पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक हिंदी साहित्यिक डॉ. कुमार विश्वास यांची उपस्थिती होय. ते या साहित्य संमेलनाला कसे हजर राहिले, त्याबाबत तीन दिवसांपासून वेगवेगळे तर्क लढवले जात असताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी समारोपीय समारंभात त्याबाबत खुलासा केला.

३ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कुमार विश्वास जेव्हा उद्घाटन समारंभाला हजर राहिले. तेव्हा उपस्थित श्रोत्यांना एक वेगळा आनंद झाला होता. काही तरी चांगले अन् सकस ऐकायला मिळणार अशी श्रोत्यांची अपेक्षा होती. त्याचमुळे जेव्हा भाषणाला त्यांचे नाव घेतले गेले तेव्हा श्रोत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. मात्र, ते केवळ पाचच मिनिटे बोलले. त्यांनी या पाच मिनिटात श्रोत्यांनाच नव्हे तर अवघ्या संमेलनालाच जिंकले, हा भाग अलहिदा. ते आले अन् जिंकून गेले, असा प्रकार घडल्याने कुमार साहित्य नगरीतून गेल्यानंतरही त्यांना संमेलनात कुणी आणले, त्यांना किती मानधन दिले गेले, यावर बरेच तर्कवितर्क लढविण्यात आले. तब्बल तीन दिवस तोच विषय अनेक ठिकाणी चर्चिला गेला. जो तो आपले तर्क ठासून सांगत होता. कुमार यांना साहित्यनगरीत आणण्याचे श्रेय कुणी मुख्यमंत्र्यांना, कुणी उपमुख्यमंत्र्यांना, कुणी मराठी भाषा मंत्र्यांना तर कुणी दत्ता मेघेंना दिले. या पार्श्वभूमीवर, रविवारी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. समारोपीय कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री गडकरी उपस्थित राहिले अन् त्यांनी साहित्य, भाषा तसेच लोकमानस याचे विश्लेषण करताना कुमार विश्वास यांच्या मराठी साहित्य संमेलनातील उपस्थितीबाबतचाही खुलासा केला.

ते म्हणाले, या संमेलनातील श्रोत्यांना चांगले काही ऐकायला मिळावे, अशी माझी ईच्छा होती. त्यासाठी मी कुमार विश्वास यांना संमेलनासाठी निमंत्रित केले. यावेळी त्यांनी (कुमार यांनी) मी हिंदीचा साहित्यीक आहे, संमेलन मराठी आहे, त्यामुळे समिकरण कसे जुळणार, असा प्रश्न केला होता. त्यावर आपण त्यांना भाषा कोणतीही असो, चांगले भाष्य ऐकण्यासाठी श्रोते नेहमीच तयार असतात अन् चांगल्या विचाराचा समाजाला फायदाही होतो. त्यामुळे आपण या संमेलनाला यायलाच पाहिजे, असे म्हटल्याचे सांगितले. गडकरींच्या या खुलाशाने कुमार विश्वासांच्या हजेरीचा उलगडा झाला. त्यानंतर श्रोत्यांनीही धन्यवादाच्या रुपात गडकरींसाठी टाळ्यांचा गडगडाट केला.

Web Title: Kumar Vishwas's presence and Nitin Gadkari's revelation in marathi sahitya sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.