कुणाल चचाणे अपहरण - हत्या प्रकरणातील आरोपींचा सात दिवसांचा पीसीआर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:15 AM2018-07-13T00:15:36+5:302018-07-13T00:17:12+5:30
कुणाल शालिकराम चचाणे (वय १७) नामक युवकाची हत्या करणारे अंबाझरीतील कुख्यात गुंड संतोष (वय ३२) आणि त्याचा भाऊ प्रशांत परतेकी (वय ३४) या दोघांना न्यायालयाने सात दिवसांचा पीसीआर मंजूर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुणाल शालिकराम चचाणे (वय १७) नामक युवकाची हत्या करणारे अंबाझरीतील कुख्यात गुंड संतोष (वय ३२) आणि त्याचा भाऊ प्रशांत परतेकी (वय ३४) या दोघांना न्यायालयाने सात दिवसांचा पीसीआर मंजूर केला.
कुणाल तेलंखेडीतील बालाजी सायकल स्टोअर्सजवळ राहत होता तर आरोपी परतेकी बंधू रामनगर तेलंखेडी परिसरातच राहतात. आरोपी संतोष आणिं त्याचा भाऊ प्रशांत या दोघांसोबत दोन दिवसांपूर्वी वाडीतील कुख्यात गुंड जेम्सचे कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात जेम्सकडून कुणाल सहभागी झाल्याने आरोपी संतोष आणि प्रशांतने कुणाल आणि जेम्सचा गेम करण्याचा कट रचला. त्यानुसार, मंगळवारी सकाळी १० वाजता कुणाल आणि त्याचा मित्र आकाश पाल फिरायला गेले असता मागावर असलेले संतोष आणि प्रशांतने कुणालला रस्त्यात गाठले. जुने भांडण विसरून जा, म्हणत आरोपींनी कुणाल तसेच आकाशला सीताबर्डी, भिवसेनखोरी गिट्टीखदान आणि वाडी परिसरात नेले. तिन्ही ठिकाणी आरोपी कुणालला मोठ्या प्रमाणात दारू पाजत असल्याचे पाहून आकाशला शंका आली. त्यामुळे तो वाडीतील कदम बारमधून पळून गेला. त्याने कुणालचा भाऊ विशाल शालिकराम चचाणे (वय २०) याला माहिती देऊन संतोष आणि प्रशांतने कुणालला सोबत नेल्याचे सांगितले. विशालने रात्री अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी रात्रभर शोधाशोध केली. मात्र, तो आढळला नाही. बुधवारी सकाळी संतोष आणि प्रशांत हाती लागताच अंबाझरीचे ठाणेदार भीमराव खंदाळे यांनी त्यांना जोरदार फटके हाणले. त्यानंतर त्यांनी कुणालची हत्या केल्याचे सांगून मृतदेह दाखवला. पोलिसांनी अपहरण आणि हत्येच्या आरोपाखाली संतोष तसेच प्रशांतला अटक केली. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करून त्यांचा १८ जुलैपर्यंत पीसीआर मिळवला.
जेम्सचा शोध सुरू
या हत्याकांडाला कारणीभूत असलेला वाडीतील जेम्स नामक कुख्यात गुंड फरार आहे. त्याच्याविरुद्ध हत्या तसेच अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो पोलिसांना वॉन्टेड असून, त्याचा शोध घेतला जात आहे.