रुग्णाचा मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड, डॉक्टरला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2022 12:47 PM2022-01-28T12:47:55+5:302022-01-28T13:06:44+5:30
वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे म्हणत संतप्त नातेवाईकांनी मानकापूर येथील कुणाल हॉस्पीटलमध्ये तोडफोड केली. डॉक्टरलाही मारहाण केली. तर, रुग्णालयात येण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे.
नागपूर : तातडीने उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे कारण पुढे करून संतप्त नातेवाइकांनी डॉक्टरला मारहाण करीत रुग्णालयाची तोडफोड केली. तर, रुग्णालयात येण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे. त्यांनी याविरोधात मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
राहुल बलराम ईवनाते (२८) कृष्ण धाम वसाहत, असे मृताचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी सकाळी १०.५० मिनिटांनी मानकापूर कोरोडी रोड येथील कुणाल हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टीमध्ये राहुलला आणले. त्या वेळी कार्यरत असलेले निवासी मेडिकल ऑफिसर डॉ. नथीक परवेज यांनी राहुलला तपासले. त्या वेळी त्यांना राहुलमध्ये कुठलीच हालचाल दिसून आली नाही. यामुळे तातडीने त्यांनी ईसीजी काढला. यावरून राहुलचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
त्यांनी याची माहिती नातेवाईकांनी दिली. परंतु काही कळण्याच्या आतच नातेवाईकांनी डॉ. परवेज यांना मराहाण करण्यास सुरूवात केली. यामुळे डॉ. परवेज यांच्या उजव्या डोळ्याला जखम झाली, सोबतच नाकातून रक्त निघायला लागले. या वेळी नातेवाईकांनी ईसीजी, मॉनिटरची तोडफोड केली. दारे-खिडक्यांच्या काचा फोडल्या. मानकापूर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. रुग्णालयातील डॉक्टरांनी खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचा आवाहनही केले. नातेवाइकांनी मृतदेह घेऊन मेयो रुग्णालय गाठले. तिथेही ईसीजी करण्यात आल्यावर आधीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
-८ लाखांचे नुकसान
कुणाल हॉस्पिटलचे संचालक डॉ. एस. श्रीवास्तव यांनी ‘लोकमत’ला सांगितले, मृत रुग्णाला रुग्णालयात आणायचे, डॉक्टरला मारहाण करायची, मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना २००वर लोकांनी घेरावा घालायचा, हा सर्व घटनाक्रम नियोजनबद्ध होता असे वाटते. नातेवाईकांनी, ईसीजी यंत्र, मॉनिटर, खिडक्यांच्या काचा, दाराची तोडफोड केली. जवळपास ८ लाखांचे नुकसान झाले. कुठलीही चूक नसताना मारहाण आणि तोडफोड करणे हे चुकीचे आहे, असेही डॉ. श्रीवास्तव म्हणाले.