कुणबींनी मूठ बांधली; आज ‘एल्गार’; मराठा समाजाचे राज्यभर आंदोलन सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 07:58 AM2023-09-08T07:58:54+5:302023-09-08T07:59:31+5:30
बीड, उमरग्यात जाळपोळ
नागपूर : मराठा समाजाला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला विदर्भातील कुणबी समाज संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. गुरुवारी कुणबी समाजातील विविध शाखांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर समाज प्रतिनिधींची बैठक झाली. त्यात या मुद्द्यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी ‘एल्गार’ बैठक बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला.
अखिल कुणबी समाज नागपूर, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, बहुउद्देशीय तिरळे कुणबी समाज, बावणे कुणबी समाज, खैरे कुणबी समाज, संत तुकाराम महाराज जयंती सेवा समिती, कुणबी सेना, खेडुला कुणबी समाज, खैरे कुणबी समाजसुधारक संस्था, लोणारे कुणबी समाज बहुउद्देशीय समाज मंडळ, संत तुकाराम महाराज कार्य समिती, बहुउद्देशीय खैरे कुणबी विचार मंच, कुणबी समाज संघटना या सर्व समाज संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.राज्य सरकारने असा कुठलाही निर्णय घेतला तर कुणबी समाज ओबीसी बांधवांसह रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी देण्यात आला.