कुणब्यांनी मुठ बांधली, आज ‘एल्गार’ बैठक; संघर्ष समिती स्थापन करणार
By कमलेश वानखेडे | Published: September 7, 2023 05:11 PM2023-09-07T17:11:17+5:302023-09-07T17:12:11+5:30
कुणबी समाजाच्या हक्कांवर कुणी गदा आणत असेल तर ते रोखण्यासाठी आंदोलन पुकारून प्रसंगी आमरण करण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आला.
नागपूर : मराठा समाजाला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला विदर्भातील कुणबी समाज संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. गुरुवारी कुणबी समाजातील विविध शाखांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यानंतर समाज प्रतिनिधींची बैठक झाली. तीत या मुद्यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी ‘एल्गार’ बैठक बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला. कुणबी समाजाच्या हक्कांवर कुणी गदा आणत असेल तर ते रोखण्यासाठी आंदोलन पुकारून प्रसंगी आमरण करण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आला.
अखिल कुणबी समाज नागपूर, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, बहुउद्देशीय तिरळे कुणबी समाज, बावणे कुणबी समाज, खैरे कुणबी समाज, संत तुकाराम महाराज जयंती सेवा समिती, कुणबी सेना, खेडुला कुणबी समाज, खैरे कुणबी समाज सुधारक संस्था, लोणारे कुणबी समाज बहुउद्देशीय समाज मंडळ, संत तुकाराम महाराज कार्य समिती, बहुउद्देशीय खैरे कुणबी विचार मंच, कुणबी समाज संघटना या सर्व समाज संघटनांचे प्रतिनिधी गुरुवारी एकत्र आले व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
यानंतर सर्व प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीला माजी मंत्री सुनील केदार, माजी आमदार अशोक धवड, जानराव पाटील केदार, पुरुषोत्तम शहाणे, नरेश बरडे, अनंत बारसाकडे, दुनेश्वर आरीकर, सुषमा भड, अवंतिका लेकुरवाळे, अरुण वऱ्हाडे, वामनराव येवले, परमेश्वर राऊत, राजू मोहोड, प्रकाश काळबांडे, मनोहर आवारी, गणेश नाखले, दादाराव डोंगरे, शरद वानखेडे, हरीश्चंंद्र बोंडे, बाबा ढोबळे, बाबा तुमसरे, सुरेश कोंगे, शरद वानखेडे, रमेश राऊत, श्रीधर नहाते, बाळा शिंगणे, रविंद्र देशमुख, सुरेश वर्षे, मनोहर फुके आदी उपस्थित होते.
तर महाराष्ट्र बंद करून दाखवू
- मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास विरोध नाही. पण त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये व ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये. राज्य सरकारने असा कुठलाही निर्णय घेतला तर कुणबी समाज ओबीसी बांधवांसह रस्त्यावर उतरेल व महाराष्ट्र बंदची हाक दिली जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
येथे होईल बैठक
- अखिल कुणबी समाज, विठ्ठल रुखमाई मंदिर, नवाबपुरा, जुनी शुक्रवारी रोड येथे दुपारी ३ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सर्व शाखीय संघर्ष समिती स्थापन करून लगेच आंदोलन पुकारले जाण्याची शक्यता आहे.