क्या बात... फर्स्ट क्लास अन् डिस्टिंक्शनचा टक्का वाढला, नागपूर विभागातून ७ टक्के विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण
By योगेश पांडे | Published: May 21, 2024 11:58 PM2024-05-21T23:58:43+5:302024-05-21T23:59:05+5:30
Nagpur HSC Result; बारावीच्या निकालात दरवर्षी प्रावीण्य श्रेणीत किती विद्यार्थी उत्तीर्ण होतात याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले असते. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत प्रावीण्य श्रेणी व प्रथम श्रेणीचा नागपूर विभागाचा टक्का वाढला आहे.
- योगेश पांडे
नागपूर - बारावीच्या निकालात दरवर्षी प्रावीण्य श्रेणीत किती विद्यार्थी उत्तीर्ण होतात याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले असते. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत प्रावीण्य श्रेणी व प्रथम श्रेणीचा नागपूर विभागाचा टक्का वाढला आहे. ३७ टक्के विद्यार्थ्यांना ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत, तर ७ टक्के विद्यार्थी ७५ टक्क्यांहून अधिक गुण घेत उत्तीर्ण झाले आहेत. प्रत्येक तीन विद्यार्थ्यांमागे एकाला तरी फर्स्ट क्लासचे गुण मिळाले आहेत.
यंदा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या नागपूर विभागातील विद्यार्थ्यांमध्ये थोडीथोडकी २.१९ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०२१ ते २०२३ या कालावधीत प्रावीण्य श्रेणीच्या विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने घट झाली होती. मात्र, यावर्षी त्याला ब्रेक लागला आहे. यंदा ११ हजार २४ विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन मिळाले आहे.
शिवाय विभागात ‘फर्स्ट क्लास’ उत्तीर्ण झालेल्यांची संख्यादेखील ३.४ टक्क्यांनी वाढली आहे. २७.०१ टक्के विद्यार्थी या श्रेणीत आहेत. मागील वर्षी अर्ध्याहून अधिक विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले होते. यंदा यात घट झाली असून ४४.८७ टक्के द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
नागपूर विभागात एकूण १ लाख ५५ हजार ३७४ पैकी १ लाख ४३ हजार १३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण परीक्षार्थ्यांपैकी ४१ हजार ९६७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले आहेत. द्वितीय श्रेणीत ६९ हजार ७११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षी ७१ हजार ३५९ म्हणजेच ५१.९१ टक्के विद्यार्थी या श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. सर्वांत जास्त विद्यार्थी याच श्रेणीत आहेत.
श्रेणीनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी
श्रेणी – टक्केवारी (२०२४) - टक्केवारी (२०२३) - टक्केवारी (२०२२) - टक्केवारी (२०२१) - टक्केवारी (२०२०)
प्रावीण्य – ७.०९ - ४.९० - १३.९० - ४६.६९ - ७.२३
प्रथम – २७.०१ - २३.६१ - ३९.२० - ४५.३६ - २९.८५
द्वितीय – ४४.८७ - ५१.९१ - ३८.३९ - ७.४९ - ५०.१९
उत्तीर्ण – १३.१५ - १९.४७ - ५.०६ - ०.०८ - ४.३७
अनुत्तीर्ण – ७.८८ - ९.६५ - ३.४६ - ०.३८ - ८.३५