मजुराच्या खात्यात ३८ लाख!

By admin | Published: March 21, 2017 01:38 AM2017-03-21T01:38:24+5:302017-03-21T01:38:24+5:30

बँकेच्या खात्यात जमा केलेले ३७ लाख ७० हजार रुपये तुम्ही कुठून आणले, त्याचा खुलासा करा, अशा आशयाची नोटीस एका मजूर दाम्पत्याला मिळाली आहे.

Labor Department accounts for 38 lakhs! | मजुराच्या खात्यात ३८ लाख!

मजुराच्या खात्यात ३८ लाख!

Next

खुलासा करा, प्राप्तिकर खात्याची नोटीस बँक अधिकाऱ्यांचा कारनामा मजूर दाम्पत्याच्या मानगुटीवर दडपणाचे भूत
नरेश डोंगरे नागपूर
बँकेच्या खात्यात जमा केलेले ३७ लाख ७० हजार रुपये तुम्ही कुठून आणले, त्याचा खुलासा करा, अशा आशयाची नोटीस एका मजूर दाम्पत्याला मिळाली आहे. रोजच्या रोजीरोटीचे वांधे असताना या भल्यामोठ्या रकमेचा हिशेब कुठून द्यायचा अन् त्यानंतर त्यावरचा लाखोंचा प्राप्तिकर कसा भरायचा, असा प्रश्न पडल्याने नरसाळा भागात राहणारे अनिता (वय ३०) आणि चंद्रकांत ऊर्फ संजय किसनराव पारधी (वय ३५) हे मजूर दाम्पत्य प्रचंड दडपणात आले आहे. बँक अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे मागे लागलेल्या या भानगडीतून सुटका व्हावी म्हणून संजय पारधी संबंधित अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवत फिरत आहे.
उमरेड मार्गावरील नरसाळा येथील गारगोटी परिसरात पारधी दाम्पत्य राहते. संजय प्लंबरचे काम करतो तर पत्नीही रोजमजुरी करते. त्यांना एक सात वर्षांचा सौरभ नामक मुलगा आहे. तो दुसरीत शिकतो. कामासाठी रोजच घरून बाहेर पडत असले तरी रोजच काम मिळेल याची शाश्वती नाही.
त्यामुळे मिळेल त्या दिवशी काम करायचे आणि त्याच पैशातून कशीबशी भाजी-भाकरी खाऊन दिवस ढकलायचे, असे पारधी दाम्पत्याचे जीवनमान. वर्षभरापूर्वी प्रत्येक गोरगरिबाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होणार, अशी संजयला कुणीतरी माहिती सांगितली.
त्यासाठी पती-पत्नीचे संयुक्त खाते (जॉर्इंट अकाऊंट) उघडण्याचा सल्लाही दिला.
त्यामुळे पारधी दाम्पत्याने वर्षभरापूर्वी सेंट्रल बँकेच्या दिघोरी (उमरेड रोड) शाखेत संयुक्त खाते उघडले. पदराला बांधलेले दोन हजार रुपये या खात्यात जमा केले. अधिक पैसे जमा करण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे बँकेत वारंवार जाण्याचा किंवा खात्यातील जमा केलेली, काढलेली रक्कम तपासण्याचाही प्रश्न नव्हता. असे असताना १० जानेवारीला चंद्रकांत पारधी यांना प्राप्तिकर खात्याची नोटीस मिळाली. ९ नोव्हेंबर (नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतरचा दुसरा दिवस) ते ३० डिसेंबर या कालावधीत आपल्या खात्यात ३७ लाख ७० हजार रुपये जमा करण्यात आले. आॅनालईन ई व्हेरिफिकेशन पोर्टलवरून त्यासंबंधीची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ही रोकड तुम्ही कुठून आणली, त्याचा खुलासा करा, असे प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी या नोटीसमधून पारधी यांना सूचविले आहे. इंग्रजीतील या नोटीसचा अर्थ दुसऱ्या एका व्यक्तीने समजावून सांगितल्याने पारधी पुरते गोंधळले.
बँक अधिकाऱ्यांची उडवाउडवी
आपल्या खात्यात ३७.७० लाखांची रोकड कशी जमा झाली, त्याची चौकशी करण्यासाठी होमेश्वर द्रव्येकर नामक मित्रासोबत पारधी सेंट्रल बँकेत गेले. यावेळी त्यांना त्यांच्या खात्यात दोनच हजार रुपये असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. ३७.७० लाख रुपये जमा झाल्याची प्राप्तिकर खात्याकडे माहिती कशी गेली, याबाबत विचारणा केली असता बँक अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले. रक्कम जमा झाल्याचा स्पष्ट इन्कार केला. त्यानंतर मात्र दुसऱ्या एका खातेधारकाने शेत विकून रक्कम खात्यात जमा केली. त्याचे आणि तुमचे नाव खालचे वर झाल्याने नजरचुकीमुळे हा घोळ झाल्याचे सांगितले.
दुसऱ्या नोटीसमुळे पत्नी आजारी
बँक अधिकाऱ्यांच्या उडवाउडवीच्या उत्तरामुळे जास्तच संभ्रमात सापडलेल्या पारधींनी आपल्या मित्रांसह प्राप्तिकर खात्याचे कार्यालय गाठले. येथील अनिल भोयर नामक अधिकाऱ्यांकडे त्यांनी चौकशी केली असता, त्यांनी बँकेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेच ही नोटीस पाठविली. तुम्ही एकटेच नाही तर अशाप्रकारे मोठ्या रकमेचे व्यवहार ज्यांच्या खात्यात झाले त्या हजारो खातेधारकांना नोटीस पाठविण्यात आल्याचेही सांगितले. पारधी यांची आर्थिक स्थिती लक्षात आल्यानंतर प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांना योग्य ते मार्गदर्शनही केले. त्यामुळे दाम्पत्याला काहीसा दिलासा मिळाला. मात्र, त्यांना पुन्हा ११ मार्चला प्राप्तिकर खात्याची दुसरी नोटीस मिळाली. या नोटीसमध्येही ३७ लाख ७० हजारांचा खुलासा करण्याचे सांगण्यात आल्यामुळे प्रचंड दडपण येऊन संजय यांची पत्नी अनिता आजारी पडली.
पारधींचा आर्थिक ताळेबंद
लोकमतजवळ आपली व्यथा सांगतानाच पारधी यांनी त्यांच्या आर्थिक मिळकतीचा ताळेबंदही मांडला. त्यांची पत्नी अनिता किडनीची रुग्ण आहे. तिच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, तशाही अवस्थेत पतीला काम न मिळाल्यास ती मोलमजुरीला जाते. संजयला महिन्यातून १५ ते २० दिवस काम मिळते. एका दिवशी कधी २०० ते तर कधी ३०० रुपये रोज मिळतो. अर्थात महिन्याला त्याला सहा ते आठ हजार रुपये मिळतात. वर्षाला फारतर ७० हजार रुपये. त्याच्या पत्नीची वार्षिक मिळकत ३० हजार रुपये धरल्यास या दाम्पत्याला वर्षभरात रोजमजुरीतून १ लाख रुपये मिळतात. त्यांच्या खात्यात जमा झालेल्या ३७.७० लाखांच्या रकमेचा हिशेब काढल्यास त्यांना सलग ३८ वर्षे काम करावे लागणार आहे.

Web Title: Labor Department accounts for 38 lakhs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.