Maharashtra Election 2019; प्रचार रॅलींमुळे कामगार मिळेनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 10:54 AM2019-10-17T10:54:51+5:302019-10-17T10:57:00+5:30

चार-पाच तासांचे ३०० रुपये मिळत असल्याने मजुरांनाही सुगीचे दिवस आले आहेत. मात्र ऐन दिवाळीच्या दिवसात ठिय्यावर मजूर मिळत नसल्याने कंत्राटदारांची चांगलीच कोंडी झाली आहे.

Labor unavailable due to rallies! | Maharashtra Election 2019; प्रचार रॅलींमुळे कामगार मिळेनात!

Maharashtra Election 2019; प्रचार रॅलींमुळे कामगार मिळेनात!

Next
ठळक मुद्देनिवडणुकीमुळे सुगीचे दिवस दिवाळीच्या तोंडावर कंत्राटदारांची कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीला चार दिवस शिल्लक असल्याने प्रचार रॅलीवर भर दिला जात आहे. उमेदवारांनी ढोलताशांच्या गजरात सकाळ-संध्याकाळ प्रचार रॅलीचा धडाका लावला आहे. काही उमेदवारांच्या प्रचार रॅलीला कार्यकर्ते मिळत नसल्याने त्यांना ठिय्यावरील मजुरांची मदत घ्यावी लागत आहे. चार-पाच तासांचे ३०० रुपये मिळत असल्याने मजुरांनाही सुगीचे दिवस आले आहेत. मात्र ऐन दिवाळीच्या दिवसात ठिय्यावर मजूर मिळत नसल्याने कंत्राटदारांची चांगलीच कोंडी झाली आहे.
निवडणुकीत प्रचाराच्या माध्यमातून आपल्याच बाजूने वातावरण असल्याचे चित्र निर्माण करण्याच्या प्रयत्नात उमेदवार असतात. परंतु यासाठी क ार्यकर्ते व लोकांची गर्दी जमविणे सर्वांना शक्य होत नाही. मोठ्या नेत्यांच्या सभांनाही अनेकदा गर्दी होत नाही.
अशावेळी गर्दी जमविण्यासाठी मजुरी देऊन लोकांना आणल्याशिवाय पर्याय नसतो. रॅलीत लोकांची गर्दी नसली तर यातून मतदारात चुकीचा संदेश जाण्याचा धोका असल्याने रॅलीत गर्दी व्हावी, यासाठी मजुरांना आणावे लागत आहे.
शहराच्या विविध भागातील ठिय्यावर सकाळी ८वाजल्यापासून मजूर जमा होतात. दुपारी १२ पर्यंत मजुरांची ठिय्यावर गर्दी असते. ठिय्यावर आलेल्या सर्वच मजुरांना काम मिळेल याची शाश्वतीही नसते. अनेकदा आठवड्यातून तीन -चार दिवस काम मिळते. इतर दिवशी मिळत नाही. मात्र दिवाळीच्या दिवसात घराची रंगरंगोटी, सफाई व दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. या दिवसात कामाची कमी नसते. कंत्राटदारांना मजुरांचा शोध घ्यावा लागतो.
मजुरीला न जाणाऱ्यांना मिळाला रोजगार
प्रचार रॅलीसाठी मागणी वाढल्याने ठिय्यावर मजूर मिळेनासे झाल्याने मजुरीला न जाणाऱ्या महिलांना जादाचे पैसे देऊ न रॅलीत सहभागी करावे लागत आहे. यातून १५ दिवस का होईना महिलांना रोजगार मिळाला आहे. जो उमेदवार अधिक पैसे देईल त्यांच्या रॅलीत महिला जात आहेत. यामुळे सकाळी एका उमेदराच्या प्रचार रॅलीत सहभागी झालेल्या महिला संध्याकाळी दुसऱ्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीत दिसत आहे. दररोज दोन पाळीत ६०० ते ८०० रुपये कमावत आहेत.
जेवण व फराळाची व्यवस्था
प्रचार रॅलीत सहभागी होण्यासाठी मजुरी सोबतच मजुरांच्या जेवणाची व फराळाची व्यवस्था करावी लागत आहे. काही उमेदवारांच्या प्रचार रॅलीत ८०० ते १००० महिलांचा समावेश असतो. सकाळच्या रॅलीत सहभागी होणाऱ्या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे तर संध्याकाळच्या रॅलीत सहभागी होणाऱ्यांसाठी फराळाची व्यवस्था केली जात आहे.

Web Title: Labor unavailable due to rallies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.