प्रयोगशाळा बनली औषध भांडार
By Admin | Published: May 3, 2017 02:39 AM2017-05-03T02:39:10+5:302017-05-03T02:39:10+5:30
महापालिकेचे इमामवाडा येथील आयसोलेशन हॉस्पिटल हे गॅस्ट्रोच्या रुग्णांसाठी सर्वात महत्त्वाचे हॉस्पिटल आहे.
आयसोलेशनची व्यथा : महापौर असताना देवेंद्र फडणवीस यांनी केले होते उद्घाटन
गणेश हूड/आनंद डेकाटे नागपूर
महापालिकेचे इमामवाडा येथील आयसोलेशन हॉस्पिटल हे गॅस्ट्रोच्या रुग्णांसाठी सर्वात महत्त्वाचे हॉस्पिटल आहे. मात्र इतर रुग्णालयाप्रमाणे या हॉस्पिटलचीही परिस्थिती फारशी वेगळी नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापौर असताना त्यांच्या हस्ते या रुग्णालयातील प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले होते. काही दिवस ही प्रयोगशाळा सुरू होती. नंतर बंद पडली ती कायमचीच. प्रयोगशाळेची दुमजली इमारत आहे. परंतु तळमजला रिकामा असून वापरात नाही. वरच्या मजल्याचा वापर औषधे ठेवण्यासाठी के ला जातो.
शहरातील दूषित पाण्याचे नमुने तपासण्याची सुविधा व्हावी. या हेतूने २६ जून १९९८ रोजी या प्रयोग शाळेचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु ही प्रयोगशाळा काही महिन्यात बंद पडली. ती पुन्हा सुरळीत सुरू व्हावी. यासाठी प्रयत्न झाले नाही. आयोसोलेशन हॉस्पिटलमधील प्रयोग शाळा सुरू असती तर रुग्णांवर उपचार करणे अधिक सोयीचे झाले असते.
आयसोलेशन दवाखान्यामध्ये दूषित पाणी व शिळे अन्न खाल्ल्याने उद्भवणाऱ्या गॅस्ट्रोच्या रु ग्णांवर उपचार केले जातात. शहरात गॅस्ट्रोच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी हे एकमेव हॉस्पिटल आहे. शहरातील जुन्या हॉस्पिटलपैकी ते एक आहे. एकेकाळी हे हॉस्पिटल रुग्णामुळे गजबजलेले असायचे. आता ती परिस्थिती राहिलेली नाही.
रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या या हॉस्पिटलमध्ये पुरुष व महिला असे दोन स्वतंत्र वॉर्ड आहेत. प्रत्येक वॉर्डात २० बेड आहेत.परंतु सुविधांचा अभाव आहे. गेल्या काही दिवसापूर्वी येथील कुलर सुरू करण्यात आले आहे. अन्यथा रुग्णांना उन्हाळ्यातही पंख्याची हवा घ्यावी लागत होती.