विडीसाठी मजुराचा खून
By Admin | Published: October 29, 2015 03:28 AM2015-10-29T03:28:20+5:302015-10-29T03:28:20+5:30
कळमना येथील एका मजुराचा केवळ विडी दिली नाही म्हणून खून करण्यात आला.
दोन आरोपी अटकेत : कळमना हत्याकांड उघडकीस
नागपूर : कळमना येथील एका मजुराचा केवळ विडी दिली नाही म्हणून खून करण्यात आला. कळमना पोलिसांनी मृताची ओळख पटविली असून दोन आरोपींना अटक केली आहे. रामचंद्र रामाजी बागडे (५४) असे मृताचे नाव आहे. नागेश ऊर्फ नाग्या प्रीतम बोरकर (२०) आणि प्रवीण ऊर्फ पऱ्या तानोबा पाटील (२४) असे आरोपीचे नाव आहे.तिघेही भांडेवाडी येथील रहिवासी आहेत.
मंगळवारी सकाळी कळमना येथील नागेश्वरनगर येथे मृतदेह आढळून आला. सुरुवातीला मृतदेह एखाद्या तरुणाचा असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तपासादरम्यान पोलिसांना रेल्वे रुळाजवळ सोमवारी रात्री काही लोकांमध्ये वाद झाल्याची माहिती मिळाली.
या आधारावर पोलिसांनी नागेश्वरनगरातील रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला तपास सुरू केला. त्यांना भांडेवाडी येथे एका ठिकाणी रुळाच्या काठावर खून पडल्याचे दिसून आले. पोलीस तपास करीत बागडे यांच्या घरी पोहोचले. त्याच्या पत्नीने सोमवारी रात्रीपासून तो घरी आला नसल्याचे सांगितले. सोमवारी रात्री पती आरोपीसोबत गेल्याचेही सांगितले. कळमना पोलिसांनी बुधवारी सायंकाळी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री तिघेही भांडेवाडी येथील रेल्वे रुळाच्या बाजूला दारु प्यायले. त्यानंतर प्रवीणने बागडेला विडीसाठी पैसे मागितले. बागडेने नकार दिला. त्यामुळे प्रवीण त्याला शिव्या देऊ लागला. बागडेने त्याला थापड मारली. दरम्यान नागेशने चाकू काढून त्याच्यावर वार केला व जखमी केले. बागडे ओळखीचा असल्याने पकडले जाण्याची भीती नागेशला होती. त्यामुळे त्याने आणखी वार करून त्याचा खून केला. खून केल्यावर दोघेही घरी आले. पुन्हा दोघांनी दारू घेतली. घरून सायकल व ब्लँकेट घेऊन पुन्हा घटनास्थळी गेले. मृतदेह ब्लँकेटने लपेटून सायकलवर ठेवला. बागडेचा मृतदेह सायकलवर तीन किलोमीटरपर्यंत आणला. तिथे रुळाच्या काठावर मृतदेह फेकून दिला. नागेश्वरनगर येथून दोघेही पारडीच्या पेट्रोल पंपावर आले. येथून ५ लिटर डिझेल खरेदी केले. मृतदेहावर डिझेल टाकून आग लावली. मंगळवारी मृतदेहाची ओळख न पटल्याने आरोपी निश्चिंत झाले. बागडे आणि आरोपी दोघेही मजुरी करीत होते. ही कारवाई डीसीपी अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील बोंडे, एपीआय धर्मेंद्र आवारे, हवालदार अरविंद मोहोड, संतोष ठाकूर, संतोष उईके, कृष्णा इवनाते, नितीन क्षीरसागर, राजू जाधव आदींनी केली. (प्रतिनिधी)