सलाईन गार्गल चाचणीसाठी अनेक शहरात लॅब सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 07:10 AM2021-06-24T07:10:00+5:302021-06-24T07:10:02+5:30
Nagpur News सलाईन गार्गल (गुळणी) द्वारे काेराेनाची चाचणी करण्याचे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (निरी) ने विकसित केलेल्या पद्धतीने टेस्ट सुरू करण्यासाठी अनेक शहरातील यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सलाईन गार्गल (गुळणी) द्वारे काेराेनाची चाचणी करण्याचे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (निरी) ने विकसित केलेल्या पद्धतीने टेस्ट सुरू करण्यासाठी अनेक शहरातील यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. नागपुरात आयजीजीएमसी (मेयाे) सह काही खासगी प्रयाेगशाळांमध्येही गुळणीद्वारे टेस्ट करण्याची व्यवस्था करण्यात आली असून, निरीने त्यांना मान्यता दिली आहे. देशात विकसित झालेले काेराेना टेस्टिंगचे हे पहिलेच तंत्र असून, तिसरी लाट आली तर कमी वेळात जास्तीत जास्त लाेकांची चाचणी करणे शक्य होणार आहे.
टेस्टिंगचे तंत्र विकसित करणारे निरीच्या व्हायराॅलाजी विभागाचे प्रमुख डाॅ. क्रिष्णा खैरानार यांनी सकारात्मक परिस्थितीची माहिती दिली. शहरातील रेनबाे मेडिनाेवासह इतर काही लॅबमध्ये टेस्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही तपासणी करून मान्यता दिली असून, लवकरच चाचणी सुरू हाेणार आहे. याशिवाय मुंबईच्या हिंद लॅबमध्येही चाचणी सुरू करण्यात येत आहे. पुण्याच्या मायलॅब प्रयाेगशाळेनेही याेजना आखली आहे. याशिवाय काेलकाता विमानतळ व चेन्नईच्या विमानतळावर गार्गल पद्धतीने चाचणी सुरू करण्यासाठी प्रयत्न चालविले असल्याचे डाॅ. खैरनार यांनी स्पष्ट केले. शासनाच्या संस्थेने विकसित केलेले तंत्रज्ञान खासगी यंत्रणांकडून स्वीकारले जाणे, ही माेठी गाेष्ट असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
निरीच्या सलाईन गार्गल तंत्राअंतर्गत रुग्णाने १५ सेकंद गुळणी केल्यानंतर जारमध्ये जमा केलेले सॅम्पलमध्ये निरीने तयार केलेले द्रव्य मिसळले जाते. ज्याद्वारे विषाणूचा आरएनए वेगळा निघताे. सध्या प्रचलित पद्धतीमध्ये अशा आरएनए एक्सट्रॅक्शनची गरज हाेती, जी निरीने संपविली. दरम्यान, इंडियन काॅन्सिल फाॅर मेडिकल ॲन्ड रिसर्च (आयसीएमआर) कडून १९ मे २०२० राेजी मान्यता मिळाल्यानंतर महापालिकेच्या सहकार्याने निरीद्वारे आरपीटीएस केंद्रावर २९ मेपासून प्रत्यक्ष गुळणीद्वारे चाचणीला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत या केंद्रावर २०००च्यावर नागरिकांच्या टेस्टिंग यशस्वीपणे करण्यात आल्याचे डाॅ. खैरनार यांनी सांगितले.
ज्या प्रयाेगशाळांनी सलाईन गार्गल चाचणीसाठी परवानगी मागितली. त्यांना ५० रुग्णांवर नव्या व प्रचलित पद्धतीने तुलनात्मक अभ्यास करण्यास सांगताे. निरीच्या चाचणीबाबत १०० टक्के समाधानकारक परिस्थिती आढळल्यानंतरच मान्यता दिली जात आहे. तिसरी लाट आली, तर या तंत्राचा माेठा उपयाेग हाेईल.
- डाॅ. क्रिष्णा खैरनार, व्हायरालाॅजी विभागप्रमुख, निरी
उमरेडमधील रुग्णात नव्या स्ट्रेनचा संशय
दरम्यान, निरीच्या आरपीटीएस केंद्रावर २२ जून राेजी उमरेडमधील ९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील ८ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले. मात्र, त्यांच्या नमुन्यात विषाणूचा ‘डेल्टा प्लस’ हा नवा स्ट्रेन असण्याच्या संशयातून नमुन्यातील सिक्वेन्सिंग तपासली जात असल्याची माहिती आहे.