आदिवासी विभागाच्या दिरंगाईचा मुलांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 06:28 PM2018-07-04T18:28:32+5:302018-07-04T18:29:49+5:30
आदिवासी विकास विभागाद्वारे आदिवासी मुलांना नामांकित शाळेत प्रवेशासाठी विशेष योजना राबविली जाते. मात्र ही योजना सध्या आदिवासी पालकांसाठी चिंतेचे कारण ठरली आहे. विभागाद्वारे योजनेची प्रक्रिया राबविण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईमुळे मुलांच्या शाळा प्रवेशाचा खोळंबा निर्माण झाला आहे. यामुळे विभागाच्या योजनेतून नामांकित शाळेत प्रवेशाची वाट पाहत असणाऱ्या पालकांना मुलांचे वर्ष वाया जाईल की काय, ही भीती निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आदिवासी विकास विभागाद्वारे आदिवासी मुलांना नामांकित शाळेत प्रवेशासाठी विशेष योजना राबविली जाते. मात्र ही योजना सध्या आदिवासी पालकांसाठी चिंतेचे कारण ठरली आहे. विभागाद्वारे योजनेची प्रक्रिया राबविण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईमुळे मुलांच्या शाळा प्रवेशाचा खोळंबा निर्माण झाला आहे. यामुळे विभागाच्या योजनेतून नामांकित शाळेत प्रवेशाची वाट पाहत असणाऱ्या पालकांना मुलांचे वर्ष वाया जाईल की काय, ही भीती निर्माण झाली आहे.
झिंगाबाई टाकळी, बोखारा येथे राहणाºया जय गेडाम यांच्यासह इतर अनेक पालकांनी याबाबत व्यथा मांडली आहे. आदिवासी विभागाद्वारे गरीब मुलांना पहिल्या वर्गात प्रवेशासाठी नामांकित शाळा प्रवेश योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत यावर्षी ६५० च्यावर पालकांनी अर्ज केला होता. विभागाने अर्जातील त्रुटींमुळे काही अर्ज रद्द करून प्रवेशासाठी ५२२ मुलांचे अर्ज पात्र ठरले असून, ही यादी आदिवासी भवनात लावण्यात आली आहे. योजनेच्या निर्धारित संख्येनुसार विभागाद्वारे लकी ड्रॉ काढून ५२२ पैकी केवळ १०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. यातच खरा घोळ निर्माण झाला असून यामुळे पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. खासगी वाहनचालक असलेल्या जय गेडाम यांचा व त्यांच्या भावाच्या मुलांसाठी अर्ज केला होता व त्यांची नावेही निवड यादीत आहेत. मात्र एकीकडे बहुतेक शाळांमध्ये प्रवेश घेण्याची मुदत संपत आहे तर दुसरीकडे विभागाची प्रक्रिया खोळंबली आहे. अशापरिस्थितीत विभागाच्या लकी ड्रॉमध्ये त्यांची मुले अपात्र ठरली तर मुलांचा प्रवेश कुठे घ्यायचा, हा प्रश्न त्यांच्या व इतर पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. शाळांमध्ये प्रवेशच मिळाला नाही तर त्यांच्या मुलांचे वर्ष वाया जाणार की काय, अशी भीती त्यांच्यात निर्माण झाली आहे. विभागाचे अधिकारी याबाबत समाधानकारक उत्तर देत नसल्याचे गेडाम यांनी सांगितले. ही प्रक्रिया पुणे व नाशिकमधून होत असल्याने आमच्या हाती काही नाही, असे उत्तर मिळत असल्याचे गेडाम म्हणाले. ५२२ पैकी कोणत्याही १०० मुलांची निवड तर होईल. मात्र विभागाच्या या दप्तरदिरंगाईमुळे निवड न झालेल्या ४२२ मुलांच्या शाळा प्रवेशाचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे.