जनगणनेअभावी ओबीसी समाजाची पीछेहाट : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 08:55 PM2020-01-20T20:55:20+5:302020-01-20T20:56:59+5:30
ओबीसी समाजाची जनगणना न केल्यामुळे केंद्राकडून ओबीसींना तुटपुंजे आर्थिक साहाय्य मिळते. त्याचा परिणाम ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासावर झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासनाकडे १९३१ पासून सातत्याने मागणी करूनही ओबीसी समाजाची जनगणना करण्यासाठी शासनाने उदासीनता दाखविली आहे. ओबीसी समाजाची जनगणना न केल्यामुळे केंद्राकडून ओबीसींना तुटपुंजे आर्थिक साहाय्य मिळते. त्याचा परिणाम ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासावर झाला असून शासनाने ओबीसींची जनगणना करावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संविधान चौकात आयोजित धरणे आंदोलनाद्वारे केली.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसींच्या जनगणनेच्या मागणीसाठी संविधान चौकात धरणे आंदोलनाचे आयोजन केले. आंदोलनात महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, शरद वानखेडे, गुणेश्वर आरीकर, अतुल लोंढे, सुषमा भड, कल्पना मानकर, अॅड. रेखा बाराहाते, कुंदा ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी ओबीसी समाजाची पीछेहाट झाली असून, शासनाने ओबीसींची जनगणना करून समाजाला न्याय देण्याची मागणी केली. सर्व राज्याला मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांनी ओबीसी जनगणनेचा ठराव पारित करण्याचे आवाहन त्यांनी केले. जावेद पाशा यांनी सीएए आणि एनआरसीला विरोध दर्शवून हा कायदा रद्द करण्याची मागणी केली. अतुल लोंढे यांनी आर्थिक परिवर्तनाच्या दृष्टीने ओबीसींची जनगणना महत्त्वाची असल्याचे सांगितले. केंद्र शासनाने ओबीसी जनगणना करण्यासंदर्भात कारवाई न केल्यास ओबीसी समाजातर्फे असहकार आंदोलन करण्याचा इशारा शरद वानखेडे यांनी दिला. आंदोलनानंतर डॉ. बबनराव तायवाडे, कवी प्रा. ज्ञानेश्वर वाकुडकर, शकील पटेल, अतुल लोंढे, निलेश कोढे, रोशन कुंभलकर, रोहित हरणे, अॅड. रेखा बाराहाते, कल्पना मानकर, वृंदा ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर केले. आंदोलनात सहभागी मान्यवरांनी जोरदार नारेबाजी करून ओबीसी समाजाची जनगणना करण्याची मागणी रेटून धरली. यावेळी नंदा देशमुख, अनिता ठेंगरे, लक्ष्मी सावरकर, निलेश कोढे, रोशन कुंभलकर, अविनाश काकडे, रोहित हरणे, विनोद हजारे, राम वराडे, विशाल आसूटकर, गायत्री टेंबरे, चंद्रकांत हिंगे, प्रा. संजय पन्नासे, शकील पटेल, गणेश नाखले, पांडुरंग काकडे, अॅड. सूर्यकांत जयस्वाल, हेमंत गावंडे, पुरुषोत्तम शहाणे यांच्यासह ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.