राजकारणात विकासावरील चिंतनाचा अभाव

By admin | Published: September 14, 2015 03:25 AM2015-09-14T03:25:53+5:302015-09-14T03:25:53+5:30

राजकारणात विकासावरील चिंतनाचा अभाव आहे. यामुळे पत्रकारांनी केवळ नेत्यांच्या उणिवा न दाखवता समस्यांवर उपायही सुचविले पाहिजे.

Lack of contemplation of development in politics | राजकारणात विकासावरील चिंतनाचा अभाव

राजकारणात विकासावरील चिंतनाचा अभाव

Next

नितीन गडकरी : अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान
नागपूर : राजकारणात विकासावरील चिंतनाचा अभाव आहे. यामुळे पत्रकारांनी केवळ नेत्यांच्या उणिवा न दाखवता समस्यांवर उपायही सुचविले पाहिजे. राजकारणाला दिशा देण्याचे कार्य पत्रकार करू शकतात, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
‘लोकमत’चे नवी दिल्ली येथील प्रतिनिधी रघुनाथ पांडे व पत्रकार अविनाश दुधे यांना रविवारी पंचशील चौकातील श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात गडकरी यांच्या हस्ते २०१४ चा अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विदर्भ गौरव प्रतिष्ठान व श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. २१ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. माजी खासदार दत्ता मेघे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर माजी खासदार बनवारीलाल पुरोहित प्रमुख अतिथी होते.
गडकरी पुढे म्हणाले, आपण समस्यांची चर्चा करतो, पण उपायांवर कोणीच बोलत नाही. शेतकरी आत्महत्या हा विदर्भाला भेडसावत असलेला गंभीर प्रश्न आहे. विदर्भातील नेत्यांसाठी ही लज्जास्पद बाब आहे. यावर उपाय शोधण्यासाठी लवकरच तज्ज्ञांची बैठक घेणार आहे. परंतु कापूस, गहू व धान लावल्यामुळे समस्या सुटणार नाही. बाजारपेठ मागणी व पुरवठ्यावर चालते, हे लक्षात घेतले पाहिजे. देशात विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता जास्त आहे.
महाराष्ट्रात विचारभिन्नतेचे नेतेही मिळून राहतात. हा मराठी माणसाचा चांगला गुण आहे. मेघे यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा प्रभाव वाढला असला तरी वर्तमानपत्रे कधीच बंद होणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला तर पुरोहित यांनी पत्रकारांनी नैतिकतेची लक्ष्मणरेषा कधीही ओलांडू नये, असे आवाहन केले. कार्यक्रमाला नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रम्हाशंकर त्रिपाठी, सचिव शिरीष बोरकर उपस्थित होते.
प्रतिष्ठानचे सचिव गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक तर ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव यांनी संचालन केले तर नागपूर श्रमिक पत्रकार ट्रस्टचे विश्वस्त प्रदीप मैत्र यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Lack of contemplation of development in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.