‘जीपीएस सिस्टीम’अभावी रेतीचाेरीला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:38 AM2021-02-05T04:38:29+5:302021-02-05T04:38:29+5:30

अरुण महाजन लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : रेतीचाेरीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने रेतीची उचल व वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाला ...

Lack of ‘GPS system’ is rampant | ‘जीपीएस सिस्टीम’अभावी रेतीचाेरीला उधाण

‘जीपीएस सिस्टीम’अभावी रेतीचाेरीला उधाण

Next

अरुण महाजन

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापरखेडा : रेतीचाेरीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने रेतीची उचल व वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाला ‘जीपीएस सिस्टीम’ (ग्लाेबल पाेझिशनिंग सिस्टीम) लावणे अनिवार्य केले आहे. या सिस्टीममुळे रेतीवाहतुकीच्या वाहनांचा ठावठिकाणा लगेच कळत असून, त्याचा तातडीने शाेध घेणेही शक्य हाेते. महसूल व खनिकर्म विभागाने ‘जीपीएस सिस्टीम’ रेती वाहतुकीच्या वाहनांना लावण्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केल्याचे सूत्रांनी सांगितले.

सावनेर तालुक्यातील कन्हान नदीवरील सर्वच रेतीघाटांमधून माेठ्या प्रमाणात रेतीची चाेरी केली जात असल्याने राज्य शासनाच्या काेट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी फेरले आहे. महसूल विभागातील अधिकारी कारवाईच्या नावावर राेडवर धावणाऱ्या रेती वाहतुकीच्या वाहनांवर लक्ष केंद्रित करीत असून, रेतीचा अवैध उपसा हाेणाऱ्या घाटांकडे सपशेल दुर्लक्ष करतात. कन्हान नदी महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे. नागपूर जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव झाले नसताना कन्हान नदीवरील घाटांमधून माेठ्या प्रमाणात रेतीची अवैध उचल करण्यात आली असून, ती आजही सुरू आहे. मध्य प्रदेशातील राॅयल्टीचा वापर करून नागपूर जिल्ह्यात रेतीची वाहतूक केली जात असून, एकाच राॅयल्टीचा वारंवार वापर केला जाताे.

मध्य प्रदेशातील राॅयल्टीवर वाहतूक केली जात असलेली वाहने मध्य प्रदेशातील नसून, ती सीमावर्ती भागातील रायवाडी व करजघाट या घाटांमधील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा धंदा कित्येक दिवसांपासून सुरू असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. रेती वाहतुकीच्या वाहनांना ‘जीपीएस सिस्टीम’ लावलेली असती तर त्या वाहनांचे लाेकेशन, काेणत्या वाहनात किती रेती आहे, त्या रेतीची उचल कधी व काेणत्या घाटातून केली आहे, ती कुठे नेण्यात आली यासह अन्य महत्त्वाच्या बाबी लगेच स्पष्ट झाल्या असत्या. त्यामुळे रेतीचाेरीला आळा घालणे व शासनाचा काेट्यवधी रुपयांचा महसूल वाचविणे सहज शक्य झाले असते. प्रशासनाने ही बाब अद्यापही गांभीर्याने घेतली नाही.

...

एका राॅयल्टीचा वारंवार वापर

एका राॅयल्टीवर रेतीची एकदाच वाहतूक करणे अनिवार्य असताना रेती तस्कर त्या राॅयल्टीचा रेती वाहतुकीसाठी वारंवार वापर करतात. याचा रेकाॅर्ड प्रशासनाकडे उपलब्ध नाही. याच राॅयल्टीचा वापर करून रात्रभर रेतीचा पाेकलेन मशीनद्वारे उपसा केला जाताे. यात सावनेर तालुक्यातील कन्हान नदीवरील रायवाडी, खापा, टेंभूरडाेह, वाकोडी, करजघाट, गोसेवाडी, रामडोंगरी, बावनगाव या घाटांचा समावेश आहे. या घाटातील रेतीचे वाहन पकडल्यास मध्य प्रदेशातील राॅयल्टी दाखविली जाते. हा प्रकार रेतीघाट परिसरातील गावांमधील नागरिकांना चांगला माहिती आहे.

....

ट्रॅक्टरच्या मदतीने रेतीसाठा

काही रेती तस्कर सावनेर तालुक्यातील कन्हान नदीतील रेतीचा अवैध उपसा करून ती ट्रॅक्टरच्या मदतीने घाटाबाहेर काढतात आणि सुरक्षित स्थळी साठा करून ठेवतात. ती रेती माेठ्या वाहनात भरून विक्रीच्या ठिकाणी पाेहाेचवली जाते. मार्गातील पाेलीस, महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची गस्तही वाचविली जाते. ती ओव्हरलाेड वाहने दुसऱ्या सुरक्षित स्थळी अंडरलाेड केली जातात. या सुरक्षित स्थळांमध्ये दहेगाव (रंगारी), खापा व सावनेर परिसराचा समावेश आहे.

...

रेतीचे परीक्षण करणे अत्यावश्यक

नागपूर जिल्ह्यातील नद्यांवरील रेतीघाटांचे लिलाव फेब्रुवारीमध्ये केले जाणार आहेत. घाटांचे लिलाव झाले नसल्याने रेतीचाेरीला प्रचंड उधाण आले. त्यासाठी मध्य प्रदेशातील राॅयल्टीचा वापर केला जाताे. यात रेती व्यावसायिकांनी प्रचंड पैसा कमावला आहे. या रेतीचे प्रयाेगशाळेत परीक्षण केल्यास ती नेमकी काेणत्या घाटातील आहे, हे स्पष्ट हाेणार असून, संपूर्ण प्रकरण चव्हाट्यावर येऊ शकते. यात नागपूर जिल्ह्यातील रेती तस्करांचे बिंग फुटू शकते. फेब्रुवारीमध्ये घाटांचे लिलाव झाल्यास ते तीन वर्षांसाठी दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Lack of ‘GPS system’ is rampant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.