मजूर नसल्याचा परिणाम होतोय नागपूर जिल्ह्यातील टंचाईच्या कामावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 08:55 PM2020-06-15T20:55:03+5:302020-06-15T20:57:44+5:30
कोविड-१९ मुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. अख्खे उद्योग, व्यवसाय ठप्प पडले. त्यामुळे मजूर आपापल्या गावाकडे परतले. आज परिस्थिती अशी झाली की कामांसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. मजुरांचा फटका जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या कामाला बसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ मुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. अख्खे उद्योग, व्यवसाय ठप्प पडले. त्यामुळे मजूर आपापल्या गावाकडे परतले. आज परिस्थिती अशी झाली की कामांसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. मजुरांचा फटका जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या कामाला बसला आहे. मजूर नसल्यामुळे कामाची गती फारच संथ आहे. त्यातच मान्सून दाखल झाल्याने टंचाईची कामे प्रलंबित राहणार आहेत.
यावर्षी टंचाईच्या कामामध्ये नादुरुस्त बोअरवेलला फ्लशिंग करून बोअर रिचार्ज करण्यावर भर देण्यात आला. जवळपास ६४४ बोअरला फ्लशिंग करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे जुन्या बोअरवेल पुन्हा पुनरुज्जीवित होऊन, त्याचा ग्रामीण नागरिकांना फायदा होणार होता. परंतु यंदा देशात कोरोनाचे संकट उभे ठाकल्यामुळे सर्वच कामे रखडलीत. त्यामुळे टंचाई आराखड्यातील कामांनाही मंजुरी मिळण्यास विलंब झाला. साधारणत: ३० जूनपर्यंत टंचाईची कामे मार्गी लावावी लागतात. परंतु यंदा मंजुरी उशिरा प्राप्त झाल्याने कामांनाही उशिरा सुरुवात झाली. त्यातच मजूर नसल्यामुळेही कामे रखडलीत. जिल्ह्यात प्रथमच ५११ गावांमधील ६४४ बोअरवेलला फ्लशिंग करण्याचे नियोजित आहे. परंतु आतापर्यंत केवळ ७७ गावांमधील ११७ बोअरवेलच्या फ्लशिंगचे काम पूर्ण झाले आहे.
यंदा टंचाई आराखड्यानुसार जिल्ह्यात ३७ कोटी ८० लक्ष रुपये प्रस्तावित होते. त्यामध्ये बोअरवेल फ्लशिंग, नवीन बोरअवेल, नळ योजना, विहिर खोलीकरण, विहिर अधिग्रहण आदी कामे करायची होती. त्यात १६० गावांमध्ये २३४ बोअरवेल करावयाच्या असून, आजवर त्यापैकी १७३ बोअरवेलचे काम पूर्ण झाले आहेत. तर ३१ गावांमधील बोअरवेलला भूवैज्ञानिक विभागाकडून रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे आता केवळ ३० जूनपर्यंत ३० बोअरवेलचीच कामे मार्गी लावायची आहेत.