गृहविलगीकरणातील रुग्णांना औषधांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:08 AM2021-04-26T04:08:17+5:302021-04-26T04:08:17+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच, रुग्ण सर्वप्रथम रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी धावाधाव करतो. शासकीय रुग्णालयांच्या पाठोपाठ खासगी ...

Lack of medication for homelessness patients | गृहविलगीकरणातील रुग्णांना औषधांचा तुटवडा

गृहविलगीकरणातील रुग्णांना औषधांचा तुटवडा

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच, रुग्ण सर्वप्रथम रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी धावाधाव करतो. शासकीय रुग्णालयांच्या पाठोपाठ खासगी हॉस्पिटलची दारेही बेडअभावी बंद असतात. अशा कठीण प्रसंगात एखाद्या खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने गृहविलगीकरणात‌ राहून औषधाेपचार घेतला जात आहे. अशा रुग्णांना आवश्यक असलेल्या औषधांचा सध्या बाजारात तुटवडा आहे. फेव्हिपिरॅवीरसह मल्टीव्हिटॅमिन आणि प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या गोळ्या‌ही मिळणे रुग्णांना दुरापास्त झाले आहे.

रुग्णालयात बेडअभावी गृहविलगीकरणात राहणारे बहुतांश रुग्ण ‘एचआरसीटी’ करून संसर्गाचा स्कोअर तपासत आहेत. ७ ते ८ स्कोअर असलेल्या रुग्णांना खासगी डॉक्टर फेव्हिपिरॅवीर, फेबीफ्लू, टॉसिलीझूमॅप या गोळ्यांसह व्हिटॅमिन व मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या लिहून देतात. सात दिवसांचा डोस असलेल्या या गोळ्यांचा रुग्णांना फायदा होत आहे. मात्र, या गोळ्या स्थानिक औषधी विक्रेत्यांकडे उपलब्ध नाही. त्यांनाही नागपूर येथील वितरकांकडे ॲडव्हान्स बुकिंग करावे लागत आहे. या गोळ्यांसाठी रुग्ण उमरेड, ब्रह्मपुरी, पवनी येथील औषधालयांचे दार ठोठावत आहे. मात्र, तेथेही मिळत नाही. शासकीय यंत्रणेत कधी या गोळ्यांचा साठा येतो आणि कधी संपतो, हे कळायला मार्ग नाही. रुग्णांना औषधच मिळत नसल्याने औषधोपचार करायचा कसा, असा प्रश्न उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टरांना पडला आहे.

फेव्हिपिरॅवीर या गोळ्यांची स्ट्रीप १,२९० ते १,६०० रुपयांपर्यंत मिळत होती. मात्र, आता‌ नव्याने आलेल्या कंपनीच्या याच गोळ्यांची किंमत २,५०० ते ३,००० रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे या गोळ्या तालुकास्तरावर खासगी औषधालयात वेळेत उपलब्ध होण्यासाठी व किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा आराेग्य प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.

....

एक स्ट्रीप आणि तीन रुग्ण

सात दिवसांच्या पूर्ण डोजसह फेव्हिपिरॅवीरची स्ट्रीप संबंधित कंपनीकडून तयार करण्यात आली आहे. त्यानुसार, रुग्ण ही संपूर्ण स्ट्रीप खरेदी करतो. मात्र, तालुकास्तरावरील खासगी औषधालयांना या गोळ्या मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही. दोन दिवसांपूर्वी शहरातील एका औषधालयात तीन रुग्ण (त्यांचे नातेवाईक) फेव्हिपिरॅवीर गोळ्यांसाठी रांगेत होते. मात्र, तेथे एकच स्ट्रीप उपलब्ध होती. औषध विक्रेत्याने तिन्ही रुग्णांना दोन-दोन दिवसाचे डोज होतील, या प्रमाणात गोळ्या दिल्या.‌ त्यामुळे पुढील डोजसाठी पुन्हा ताटकळत राहण्याची वेळ या रुग्णांवर आली. आवश्यक औषध वेळेत मिळत नसल्याने खासगी डॉक्टरांसह मेडिकल स्टोर्सचे चालकही त्रस्त आहेत.

Web Title: Lack of medication for homelessness patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.