आताच्या तरुण कलावंतांमध्ये संयमाचा अभाव : दिग्दर्शक जाहनू बरुआ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 12:18 AM2019-02-09T00:18:34+5:302019-02-09T00:19:33+5:30
आज इंटरनेटचे युग आहे. ‘वेबसिरीज’सारख्या डिजिटल युगाच्या या नव्या माध्यमाने या क्षेत्राचे आकर्षण असणाऱ्या तरुण कलावंतांना मोठे दालन उघडले आहे. या तरुणांमध्ये कमालीची प्रतिभा आहे, बुद्धिमान आहेत तसेच विचार आणि कृती करण्यातही गतिमान आहेत, ही गोष्ट मान्य करायला हवी. मात्र त्यांच्यात संयमाचा अभाव आहे. त्यांना सर्व काही झटपट हवे आहे आणि ही डिजिटल गती त्यांच्या प्रतिभेतील अडथळाही आहे. त्यामुळे तरुण कलावंतांनी सोप्या मार्गाने झटपट सर्वकाही मिळविण्याची भावना टाळावी, असे आवाहन प्रसिद्ध आसामी चित्रपट दिग्दर्शक जाहनू बरुआ यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आज इंटरनेटचे युग आहे. ‘वेबसिरीज’सारख्या डिजिटल युगाच्या या नव्या माध्यमाने या क्षेत्राचे आकर्षण असणाऱ्या तरुण कलावंतांना मोठे दालन उघडले आहे. या तरुणांमध्ये कमालीची प्रतिभा आहे, बुद्धिमान आहेत तसेच विचार आणि कृती करण्यातही गतिमान आहेत, ही गोष्ट मान्य करायला हवी. मात्र त्यांच्यात संयमाचा अभाव आहे. त्यांना सर्व काही झटपट हवे आहे आणि ही डिजिटल गती त्यांच्या प्रतिभेतील अडथळाही आहे. त्यामुळे तरुण कलावंतांनी सोप्या मार्गाने झटपट सर्वकाही मिळविण्याची भावना टाळावी, असे आवाहन प्रसिद्ध आसामी चित्रपट दिग्दर्शक जाहनू बरुआ यांनी केले.
ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, महापालिका, विदर्भ साहित्य संघ व सप्तक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दुसºया दिवशी प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व फिल्म गुरू समर नखाते यांनी जाहनू बरुआ यांची मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते. जाहनू बरुआ हे पद्मश्री व पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित दिग्दर्शक आहेत. त्यांनी आसामी आणि हिंदी भाषेत अनेक चित्रपटाचे लेखन आणि निर्मिती केली आहे. यामध्ये ‘हलोधिया चोराये बौधन खोई, फिरींगोटी, खोगोरोलोई बोहू दूर, कोनिकार रामधेनू, बांधोन, अजेयो’ या प्रसिद्ध चित्रपटांसह ‘मैने गांधी को नही मारा’ या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या अनेक क्षेत्रीय चित्रपटांना राष्ट्रीयआणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांच्या एका आसामी चित्रपटाची निर्मितीही ते करीत आहेत.
मुलाखतीच्या वेळी ते म्हणाले, प्रतिभा आणि परिश्रम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी प्रतिभेला परिश्रमाची जोड मिळणे तेवढेच आवश्यक आहे. आजही चित्रपटाच्या कथानकावर त्याचे यश अवलंबून असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आसामच्या अनेक कलावंतांनी सिनेक्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यातीलच गायक, गीतकार, संगीतकार व चित्रपट निर्माता भूपेन हजारीका यांचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. ते द्रोणाचार्य असून मी त्यांचा प्रामाणिक शिष्य ‘एकलव्य’ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ‘तुम्ही जो विचार करता ते खरे नाही आणि खरे नाहीच असे माना व या भूमिकेवर तुम्ही ठाम रहा’, हे अनेक वर्षापूर्वी हजारिका यांचे शब्द आपण आजही पाळत असल्याचे बरुआ यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंगांचा उलगडा करीत या अनुभवामुळेच आज यशापर्यंत पोहचू शकल्याची भावना व्यक्त केली.
७ फेब्रुवारीपासून सुरू झालेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १० फेब्रुवारी पर्यंत चालणार असून यादरमान भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी नागपूरकर चित्रपटप्रेमींना मिळत आहे. महोत्सवात डॉ. जब्बार पटेल व समर नखाते यांच्यासह ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, संदीप मोदी, शिवाजी पाटील, श्रीविनय सुलियन, स्वानंद किरकीरे, श्रीनिवास पोकळे आदी प्रतिभावंत चित्रपट दिग्दर्शक, गायक, अभिनेत्यांचा सहभाग राहणार आहे.