मेयोत जागेची अडचण : नॉन कोविड रुग्णांसाठी केवळ ३०० खाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 08:56 PM2020-11-10T20:56:24+5:302020-11-10T20:58:24+5:30

Mayo Hospital bed issue for noncovid इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) नॉन कोविड रुग्णांसाठी केवळ जवळपास ३०० खाटा उरल्या आहेत. रुग्णसंख्येत वाढ झाल्याने रुग्णांना ठेवावे कुठे, हा प्रश्न मेयो प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.

Lack of space in Mayo: Only 300 beds for non-covid patients | मेयोत जागेची अडचण : नॉन कोविड रुग्णांसाठी केवळ ३०० खाटा

मेयोत जागेची अडचण : नॉन कोविड रुग्णांसाठी केवळ ३०० खाटा

Next
ठळक मुद्देमेडिसीन ब्लॉक इमारतीला मंजुरीची प्रतीक्षा

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) ब्रिटिशकालीन इमारती धोकादायक असल्याचा अहवाल प्राप्त होताच जुना वॉर्ड क्र. १ ते ४ व ७ आणि ८ वॉर्ड बंद करण्यात आले. ६०० खाटांचे सर्जिकल कॉम्प्लेक्सला कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरित करण्यात आले. यामुळे आता नॉन कोविड रुग्णांसाठी केवळ जवळपास ३०० खाटा उरल्या आहेत. यातच मागील काही दिवसात नॉन कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने रुग्णांना ठेवावे कुठे, हा प्रश्न मेयो प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी ५०० खाटांच्या मेडिसीन ब्लॉक इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. परंतु अद्यापही याला मंजुरी मिळाली नाही.

मेयो रुग्णालय हे १८६२ मध्ये सिटी हॉस्पिटल या नावाने ओळखले जायचे. याची स्थापना ब्रिटिशांनी केली होती. १९६७ पासून राज्य सरकारकडे या रुग्णालयाचे नियंत्रण आले. ३८.२६ एकरमध्ये पसरलेल्या या रुग्णालयात आजही ब्रिटिशकालीन इमारतीमधून आतापर्यंत रुग्णसेवा दिली जात होती. जुन्या इमारतीचा धोका लक्षात घेऊन मागील वर्षी बांधकाम विभागाने रुग्णालयाच्या इमारतीचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ हाती घेतले. यात ‘व्हीएनआयटी’ची मदत घेतली. आठ महिन्यापूर्वीच त्याचा अहवाल प्राप्त झाला. यात ब्रिटिश कालीन इमारतीत असलेले एकूण सहा वॉर्ड धोकादायक स्थितीत असल्याचे नमूद केले. यामुळे हे वॉर्ड दुसऱ्या इमारतीत स्थानांतरित केले. मार्च महिन्यात कोविडच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. सर्जिकल कॉम्प्लेक्सला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरित केले. आता कोविडचे रुग्ण कमी होताच नॉन कोविडच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. परंतु अपुरी जागा व अपुऱ्या खाटांमुळे वाढत्या रुग्णांना दाखल कुठे करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मेडिसीन, बालरोग, प्रसुती विभागाला होणार होती मदत

अपुऱ्या जागेला घेऊन मेयोने ‘मेडिसीन ब्लॉक’ इमारतीचा प्रस्ताव तयार केला. ३ लाख स्क्वेअर फुट जागेवरील या इमारतीत मेडिसीन विभाग, बालरोग विभाग, स्त्री रोग व प्रसुती विभाग, अपघात विभाग, एमआयसीयु, पीआयसीयु, आयसीयु, चार शस्त्रक्रिया गृह, लेबर रुम, रेडिओलॉजी विभाग प्रस्तावित आहे. तळमजल्यासह सहा मजल्याची ही इमारत असणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार मेयो प्रशासनाने इमारतीच्या बांधकामाच्या प्रस्तावात वेळोवेळी बदल केला. सुमारे २५६ कोटींचा प्रस्ताव पाठविला. परंतु अद्यापही याला मंजुरी मिळाली नाही.

Web Title: Lack of space in Mayo: Only 300 beds for non-covid patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.