भारत-नेपाळमध्ये विश्वासाची कमतरता
By admin | Published: June 10, 2017 03:03 AM2017-06-10T03:03:34+5:302017-06-10T03:03:34+5:30
भारत आणि नेपाळ या दोन्ही देशात प्राचीन काळापासून संबंध आहेत. दोन्ही राष्ट्रातील नागरिकांमध्ये सामंजस्य आहे.
जनरल रुकमांगद कटवाल : ‘वर्तमान परिस्थितीत
भारत-नेपाळचे संबंध व भविष्य’ विषयावर व्याख्यान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारत आणि नेपाळ या दोन्ही देशात प्राचीन काळापासून संबंध आहेत. दोन्ही राष्ट्रातील नागरिकांमध्ये सामंजस्य आहे. नेपाळसाठी भारत नेहमीच मोठ्या भावासारखा राहिला आहे, असे असले तरी दोन्ही देशांमधील संबंधात विश्वासाची कमतरता आहे, अशी जाहीर कबुली नेपाळचे रिटायर्ड चीफ आॅफ आर्मी स्टाफ जनरल रुकमांगद कटवाल यांनी येथे दिली.
भारतीय विचार मंचतर्फे ‘वर्तमान परिस्थितीत भारत-नेपाळचे संबंध व भविष्य’ या विषयावर चिटणवीस सेंटर येथे परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. त्यावर आपले विचार व्यक्त करताना ते बोलत होते. जनरल कटवाल म्हणाले, भौगोलिकदृष्ट्या नेपाळ आणि भारत हे शेजारी आहेत. त्यामुळे नेपाळ हा देश स्थिर राहणे हे भारतासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. भारत-नेपाळचे संबंध अतिशय जुने असले तरी त्यात मागील काही वर्षांपासून दोन्ही देशात विश्वासाची कमतरता आहे. यासाठी नेपाळमधील राजकीय परिस्थितीसुद्धा कारणीभूत आहे. कारण नेपाळमध्ये राजकीय वातावरण फारसे स्थिर राहिलेले नाही. त्यामुळे चर्चा करायची तरी कुणाशी असा पेच भारतासमोर राहत असतो.
नेपाळ सध्या धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून लोकशाहीदृष्ट्या ते विकसित होत आहे. ते चांगले विकसित व्हावे, आणि राजकीयदृष्ट्या स्थिर राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी उपस्थितांच्या अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरेही दिली. उमेश अंधारे यांनी भूमिका विषद केली.
नेपाळ हिंदू राष्ट्र नको, मूठभर नेत्यांचा निर्णय
नेपाळची हिंदू राष्ट्राची ओळख मिटवून एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र करावे, असा निर्णय नेपाळमधील काही मूठभर नेत्यांनी बसून घेतला, अशी मागणी कुणीही केली नव्हती. तसेच नागरिकांमधूनही अशी मागणी नव्हती. हा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याचे फायदे अजूनतरी दिसून आलेले नाहीत, असेही जनरल रुकमांगद कटवाल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.