आगळ्यावेगळ्या समाजसेवेचा गाैरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:38 AM2021-02-05T04:38:35+5:302021-02-05T04:38:35+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कोंढाळी : अपघातातील जखमींना मदत असाे वा मृतदेह शवविच्छेदनगृहापर्यंत पाेहाेचविण्याचे कार्य असाे, संकटकाळात ते नेहमी तत्पर ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोंढाळी : अपघातातील जखमींना मदत असाे वा मृतदेह शवविच्छेदनगृहापर्यंत पाेहाेचविण्याचे कार्य असाे, संकटकाळात ते नेहमी तत्पर असतात. काेंढाळी परिसरात गेल्या २० वर्षांपासून मुरली मानकर यांनी आगळ्यावेगळ्या समाजसेवेचे व्रत अंगीकारले आहे. त्यांच्या या धाडसी समाजसेवेचा काेंढाळी पाेलिसांनी गाैरव केला.
काेंढाळी भागातील सुमारे ५० कि.मी. परिसरात महामार्ग व राज्य महामार्ग आहेत. या मार्गाने हजाराे वाहनांची वर्दळ, तसेच अवजड वाहतूक सुरू असते. मार्गावर रात्री-अपरात्री अपघात हाेतात. अपघातातील जखमींना तातडीने मदत मिळणे गरजेचे असते. अपघातात चेंदामेंदा झालेले मृतदेहाच्या वाहतुकीची समस्या निर्माण हाेते. अशावेळी पाेलिसांच्या मदतीला धावून जात गेल्या २० वर्षांपासून मुरली मानकर हे सेवाभाव जपत आहेत.
काेंढाळी नजीकच्या पांजरा काटे येथील रहिवासी असलेले मुरली मानकर (वय ५५) वारकरी संप्रदायाचे आहेत. कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट प्रावीण्य मिळविणाऱ्या मानकर यांच्याकडे जुनी कमांडर जिप आहे. पाेलिसांचा फाेन येताच ते तत्काळ अपघातस्थळी पाेहाेचतात. मृतदेह जिपमधून नागपूर अथवा काटाेल येथे शवविच्छेदनासाठी नेतात. अनेकदा मृतांची संख्या अधिक असते, अशा कठीणप्रसंगी मुरली मानकर स्वत: मृतदेह याेग्य पद्धतीने वाहनात ठेवून घेऊन जातात. विशेष म्हणजे, या समाजसेवेच्या कार्यात वाहतुकीचा खर्चही ते स्वत:च करतात. त्यांच्या कार्याचा गाैरव म्हणून काेंढाळीचे नवनियुक्त ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांनी मुरली मानकर यांचा नुकताच सत्कार केला. याप्रसंगी जि. प. सदस्य पुष्पा चाफले, सरपंच केशव धुर्वे, उपसरपंच स्वप्निल व्यास, माजी जि. प. सदस्य रामदास मरका, माजी पं. स सभापती शेषराव चाफले, सुभाष ठवळे, प्रमाेद चाफले, आदी उपस्थित हाेते.