नागपुरात आॅईल विक्रीच्या नावावर लाखोंचा चूना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:49 AM2018-03-30T00:49:48+5:302018-03-30T00:50:08+5:30
कुकिंग आॅईल विकण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी हुडकेश्वरमधील एका व्यावसायिकाला ७ लाख, ७० हजारांचा गंडा घातला. निशांत पांडुरंग जांगरे (वय ३२, रा. अध्यापकनगर, मानेवाडा) असे फसगत झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गब्बार जबोर नामक हंगेरीतील आरोपीवर गुन्हा नोंदविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुकिंग आॅईल विकण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी हुडकेश्वरमधील एका व्यावसायिकाला ७ लाख, ७० हजारांचा गंडा घातला. निशांत पांडुरंग जांगरे (वय ३२, रा. अध्यापकनगर, मानेवाडा) असे फसगत झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गब्बार जबोर नामक हंगेरीतील आरोपीवर गुन्हा नोंदविला आहे.
२९ जून २०१६ ला फिर्यादी जांगरे गुगलवर प्रोडक्ट सर्च करीत होते. दरम्यान त्यांना एफ.ई. एम. एन.वाय. ई. आर. एस. ए. एन. एम. ए. जी. कं.एच.डी नावाच्या हंगेरी येथील कंपनीबाबत माहिती मिळाली. कंपनीचा यूज्ड कुकिंग आॅईलचा व्यवसाय असल्याची त्यावर माहिती होती. त्यांनी वेबसाईटवर दिलेल्या फोन क्रमांक ३२४६५७७७९७४ वर कंपनीचा एजंट (आरोपी) गब्बार जबोर याच्याशी संपर्क साधून आपल्याला कुकिंग आॅईल खरेदी करायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी आरोपी जबोर याने पाठवलेल्या नमुन्यावर सह्या करून कंपनीशी करार केला. करारानंतर आरोपीने त्यांना हंगेरी येथील कंपनीच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. तांत्रिक कारणांमुळे पैसे जमा होऊ शकले नाही. त्यामुळे आरोपीने त्यांना दिल्लीतील लाल थागून नावाच्या इसमाच्या स्टेट बँक आॅफ मैसूर या बँकेच्या खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितले. त्यानुसार जांगरे यांनी लाल थागूनच्या ७ लाख, ७० हजार रुपये जमा केले. पैसे जमा झाल्यावर आरोपी जबोरने त्यांना व्यवहारासंबंधीची कागदपत्र पाठविले. कागदपत्र तपासल्यानंतर ती बनावट असल्याचे जांगरे यांच्या लक्षात आले. त्यांनी आरोपीशी संपर्क साधून रक्कम परत मागितली असता त्याने नकार दिला. आरोपीने फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने जांगरे यांनी थेट डायरेक्टर जनरल आॅफ फॉरेन ट्रेड यांच्याकडे तक्रार दाखल केली. मात्र तेथून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी त्यांनी हुडकेश्वर ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.