‘लाडली लक्ष्मी’ आता नव्या स्वरूपात
By Admin | Published: June 25, 2017 02:13 AM2017-06-25T02:13:11+5:302017-06-25T02:13:11+5:30
दारिद्र्य रेषेखालील(बीपीएल) कुटुंबातील मुलींना विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी २०१२ मध्ये महापालिकेने लाडली लक्ष्मी योजना आणली होती.
स्थायी समितीची मंजुरी : बीपीएल कुटुंबातील मुलींना लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारिद्र्य रेषेखालील(बीपीएल) कुटुंबातील मुलींना विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी २०१२ मध्ये महापालिकेने लाडली लक्ष्मी योजना आणली होती. परंतु कें द्र सरकारच्या आयआरएडीपीने ही योजना बंद केली होती. मात्र आता ही योजना नव्या स्वरूपात राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तीन वर्षासाठी या योजनेला शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली तसेच या योजनेसाठी अभिकर्ता नियुक्त करण्याचा प्रश्नही निकाली काढला आहे.
तत्कालील स्थायी समितीचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी ही योजना आणली होती. अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात आली होती. या योजनेला प्रतिसादही मिळाला होता. परंतु आयआरएडीपीने ही योजना बंद केली होती. आता नव्याने ही योजना राबविली जाणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली आहे. योजनेच्या नवीन स्वरूपाला मंजुरी देणे आवश्यक असल्याने स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली. या योजनेसाठी अभिकर्ता म्हणून राधा चकोले-सुपारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लाडली लक्ष्मी योजनेमध्ये ० ते १ वर्षाच्या आतील असलेल्या मुलींची निकषानुसार निवड के ली जाणार आहे. महापालिकेतर्फे प्रथम वार्षिक हप्ता ३६४५ रुपये व त्यानतंरच्या वर्षापासून १९ वर्षापर्यंत वार्षिक हप्ता ३५७९ रुपये द्यावयाचा आहे. मुलीच्या २० व्या वर्षापर्यत या योजनेचा हप्ता भरावयाचा आहे. त्यापुढील पाच वर्ष हप्ता भरावयाचा नाही. त्यानंतर या योजनेचा लाभार्थीला लाभ मिळणार आहे. मुलीच्या २० वर्षानंतर व २५ व्या वर्षापर्यंत तिच्या खात्यात १,९८,७५० रुपये जमा होणार आहे. या योजनेच्या करारानुसार अभिकर्त्याला एक हजार लाभार्थी अपेक्षित आहेत. अभिकर्त्याचे काम समाधानकारक असल्यास तीन वर्षानंतर या योजनेला मुदतवाढ देण्याचा विचार केला जाणार आहे.