‘लेडी चिटर’ हॉटेलमधून थेट तुरुंगात!

By Admin | Published: October 22, 2016 02:32 AM2016-10-22T02:32:29+5:302016-10-22T02:32:29+5:30

बोगस ओळखपत्राच्या मदतीने एक तरुणी महिनाभरापासून रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे थांबली होती.

'Lady Chitter' from the hotel directly in prison! | ‘लेडी चिटर’ हॉटेलमधून थेट तुरुंगात!

‘लेडी चिटर’ हॉटेलमधून थेट तुरुंगात!

googlenewsNext

नागपूर : बोगस ओळखपत्राच्या मदतीने एक तरुणी महिनाभरापासून रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे थांबली होती. वारंवार तगादा लावूनही ती खोलीचे भाडे जमा करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने हॉटेल व्यवस्थापनाला तिच्यावर संशय आला. व्यवस्थापनाने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या सक्रियतेने तिचे पितळ उघले पडले.
पूजा ठक्कर ऊर्फ पूजा खान (२७) रा. जुहू मुंबई असे आरोपी तरुणीचे नाव आहे. पूजा २३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे आली. तिने स्वत:ची ओळख इंटरनॅशनल कौन्सिल आॅफ ज्युरीचे सदस्य असल्याचे करून दिली. स्वत:चे ओळखपत्र दाखवून हॉटेलमध्ये खोली बुक केली. हॉटेलच्या अधिकाऱ्यांनी नियमानुसार पूजाकडून ‘अ‍ॅडव्हान्स’सुद्धा घेतला नाही. पूजा ही विधी सेवेची अधिकारी असल्याचे हॉटेलच्या अधिकाऱ्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी तिच्यावर ‘अ‍ॅडव्हान्स’साठी दबाव टाकणे योग्य समजले नाही.

आयपीएसशी झाले लग्न
नागपूर: मधल्या काळात पूजा पुण्याला गेली. तेथून परत आल्यावर हॉटेलच्या व्यवस्थापकांनी तिला हॉटेलचे बिल भरण्यास सांगितले. तेव्हा हॉटेलच्या खात्यात आॅनलाईन रक्कम जमा करण्यात आल्याचे पूजाने सांगितले. परंतु नंतर रक्कम जमा झाली नसल्याचे लक्षात आल्यावर हॉटेल व्यवस्थापकांनी तिला पुन्हा पैसे भरण्यास सांगितले. वारंवार तगादा लावूनही पूजा पैसे भरण्यास टाळाटाळ करू लागली.
पूजाचे प्रभावशाली व्यक्तित्त्व आणि वाक्पटुतेमुळे हॉटेलचे अधिकारी तिला सामना करू शकत नव्हते. पूजा पैसे भरत नसल्याने तिला हॉटेल खाली करण्यास सांगण्यात आले. तेव्हा पूजा आणखीनच संतापली. तिने हॉटेल व्यवस्थापकांना गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. प्रशासनात आणि पोलीस विभागातील अनेक अधिकाऱ्यांशी आपली ओळख असल्याचे सांगत तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. या दरम्यान हॉटेलच्या अधिकाऱ्यांनी पूजाची माहिती काढण्यास सुरुवात केली तेव्हा पूजाचा खरा चेहरा उघडकीस आला. पूजाचे ओळखपत्र बोगस असल्याचे आढळून आले. खूप शोध घेतल्यानंतर पूजाविरुद्ध उत्तराखंडमधील मसुरी आणि मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याची बाब उघडकीस आली. मुंबईत ती सीबीआय अधिकारी म्हणून लाल दिव्याच्या गाडीत फिरत होती. गुरुवारी हॉटेलच्या व्यवस्थापक निधी नायर यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पूजाला शुक्रवारी सकाळी अटक केली. पूजा ही नवरात्रीसाठी नागपुरात आल्याचे सांगत आहे.
सूत्रानुसार नीलेश ठक्कर याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर पूजाने जुलै महिन्यात एका सेवानिवृत्त आयपीएसशी लग्न केले आहे. त्यामुळे ती पूजा खान म्हणून सुद्धा स्वत:ची ओळख सांगते. लग्नाच्या दोन महिन्यानंतरच ती पतीपासून वेगळी राहत आहे. यासंदर्भात विचारणा केली असता ती काहीही सांगत नाही. हॉटेलमध्ये स्पा चालवणाऱ्या महिलेकडूनही पूजाने मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी केल्या आहेत. तसेच टॅक्सीचालकाचेही बिल शिल्लक असल्याचे सांगितले जाते. (प्रतिनिधी)

Web Title: 'Lady Chitter' from the hotel directly in prison!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.